Plane Crash In December: विमान प्रवासात डिसेंबर ठरला धोकादायक महिना; सहा विमान अपघातात 234 जणांनी गमावला जीव
Plane Crash In December: 2024 वर्ष संपण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. या चालू वर्षाच्या अखेरच्या महिन्यात एकापाठोपाठ एक असे अनेक भीषण विमान अपघात (Plane Crash) घडले. या अपघातांमध्ये फक्त डिसेंबर महिन्यातच 234 लोकांनी आपला जीव गमावल्याची माहितीसमोर आली आहे. सर्वात मोठा अपघात आज दक्षिण कोरियामध्ये झाला. ज्यात 177 जणांचा मृत्यू झाला. या अपघातांमुळे विमान प्रवास खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(South Korea Plane Crash: किती धोकादायक असते विमानाला पक्ष्याची धडक? कसं होऊ शकतं प्लॅन क्रॅश?)
दक्षिण कोरिया विमान अपघात
बँकॉकहून परतणाऱ्या जेजू एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाचा दक्षिण कोरियामध्ये भयंकर अपघात झाला. विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याने पायलटला विमान सुरक्षित लँड करता आले नाही. लँडिंग करताना विमान धावपट्टीवर घसरले. त्यानंतर ते विमानतळाच्या भिंतीवर आदळले. या धडकेमुळे विमानाला भीषण आग लागली. ज्यामध्ये किमान 177 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात 181 लोक प्रवास करत होते. सध्या या अपघाताची नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अझरबैजान एअरलाइन्स विमान अपघात
अझरबैजान एअरलाइन्सचे विमान 25 डिसेंबर रोजी कझाकस्तानमधील अकताउ विमानतळाजवळ क्रॅश झाले. या भीषण अपघातात 38 लोक ठार झाले. हे विमान अझरबैजानची राजधानी बाकूहून ग्रोझनीला जात होते. या विमानात 67 जण प्रवास करत होते, ज्यापैकी 38 लोक ठार झाले. तर इतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ब्राझील विमान अपघात
ब्राझीलमध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांचा 22 डिसेंबर रोजी झालेल्या एका खाजगी विमान अपघातात मृत्यू झाला होता. दक्षिण ब्राझीलमधील लोकप्रिय पर्यटन शहर ग्रामाडोच्या मध्यभागी 10 जणांना घेऊन जाणारे हे छोटे विमान कोसळले.
पापुआ न्यू गिनी विमान अपघात
ब्रिटन-नॉर्मन BN-2B-26 आयलँडर हे विमान 22 डिसेंबर रोजी पापुआ न्यू गिनीमध्ये कोसळले. या भीषण अपघातात विमानत प्रवास करत असलेले सर्व पाचही लोक ठार झाले. हे विमान वासू विमानतळावरून लेय-नादजाब विमानतळाकडे जात होते.
अर्जेंटिना विमान अपघात
द बाँबारडीयर BD-100-1a10 चॅलेंजर 300 हे विमान अर्जेंटिनामधील सन फर्नांडो विमानतळाजवळ कोसळले. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. हे विमान पुंता डेल एस्टे विमानतळावरून सॅन फर्नांडो विमानतळाकडे जात होते. धावपट्टीवर उतरत असताना हे विमान विमानतळाचे कुंपण आणि झाडावर जाऊन आदळले त्यानंतर या विमानाला आग लागली.
हवाई विमान अपघात
याच महिन्यात 17 डिसेंबर रोजी कमाका एअर एलएलसीचे सेस्साना 208B ग्रँड कॅरव्हॅन हे विमाना होनोलुलू येथील डॅनियल के इनूये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले. या दुर्घटनेत देखील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला.