आता अॅमेझॉनवर करता येणार विमानाचे तिकिट बुकिंग, Cleartrip सोबत केली भागीदारी
अॅमेझॉन अॅपच्या माध्यमातून देशांतर्गत विमानांचे तिकिट आरक्षित करता येणार आहे.
ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडिया (Amazon India) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी नवनवीन स्कीम राबवत असतो. त्यातच भर म्हणून अॅमेझॉनने आपल्या भारतीय ग्राहकांसाठी एक नवीन जबरदस्त योजना सुरु केली. आता ग्राहकांना त्यांच्या अॅमेझॉन अॅपच्या माध्यमातून देशांतर्गत विमानांचे तिकिट आरक्षित करता येणार आहे. याशिवाय शॉपिंग, पैसे ट्रान्सफर करणे, बिल पेमेंट, मोबाइल रिचार्जही ‘अॅमेझॉन पे’च्या अॅपच्या सहाय्याने करता येतील. अॅमेझॉनने नुकतीच याबाबत माहिती दिली.
यासाठी अॅमेझॉनने ऑनलाईन ट्रॅव्हल पार्टनर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म क्लिअरट्रिपच्या भागीदारी केली आहे. ज्याच्या माध्यमातून अॅमेझॉनने विमानांच्या तिकीटांच्या आरक्षणाची सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांना ह्या स्कीमद्वारे तिकिट बुकिंगचा एक उत्कृष्ट अनुभव मिळेल, असे‘अॅमेझॉन पे’चे संचालक शारिक प्लास्टीकवाला यांनी सांगितले आहे.
तसेच प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकीट रद्द केल्यास अॅमेझॉन कोणतेही शुल्क आकारणार नाही. प्रवाशांकडून केवळ कॅन्सलेशन पेनल्टी आकारण्यात येणार येईल असेही ते पुढे म्हणाले. यापुढेही ‘अॅमेझॉन पे’च्या माध्यमातून ग्राहकांसाठी अनेक नवनव्या सुविधा सुरू करणार आहोत. तसेच मेंबरशिपच्या माध्यमातूनही ग्राहकांना अधिक फायदा मिळवून देण्यावर आमचा भर असेल, असेही प्लास्टीकवाला यांनी नमूद केले.