IPL Auction 2025 Live

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल WhatsApp ने मागितली जाहीर माफी; Minister Rajeev Chandrasekhar यांची केली होती कारवाईची मागणी

व्हॉट्सअॅपच्या या कृत्याबद्दल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर (Minister Rajeev Chandrasekhar) यांनी व्हॉट्सअॅपला फटकारले असून व्हिडिओ दुरुस्त करण्यास सांगितले आहे.

WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

मेटा-मालकीच्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये भारताचा नकाशा (India Map) चुकीचा दाखवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये जम्मू-काश्मीरच्या भागाशी छेडछाड करण्यात आली होती. व्हॉट्सअॅपच्या या कृत्याबद्दल भारतीय युजर्समध्ये नाराजी दिसून आली. त्यानंतर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर (Minister Rajeev Chandrasekhar) यांनीही व्हॉट्सअॅपला फटकारून तो व्हिडिओ दुरुस्त करण्यास सांगितले होते.

आता व्हॉट्सअॅपने हा व्हिडीओ काढून टाकला असून, घडल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली आहे. यापूर्वी देखील, भारताचा चुकीचा नकाशा शेअर केल्याबद्दल राजीव चंद्रशेखर यांनी झूमचे सीईओ एरिक युआन यांना फटकारले होते. आता मंत्र्यांनी व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओला उत्तर दिले की, ‘प्रिय @WhatsApp - तुम्हाला विनंती आहे की भारताच्या नकाशातील चूक लवकरात लवकर दुरुस्त करा. भारतात व्यवसाय करणाऱ्या किंवा भारतात व्यवसाय सुरू ठेवू इच्छिनाऱ्या सर्व प्लॅटफॉर्म्सनी योग्य नकाशे वापरावेत.’

त्यावर व्हॉट्सअॅपने व्हिडीओ काढून सांगितले की, 'अनपेक्षित त्रुटी निदर्शनास आणल्याबद्दल मंत्री महोदयांचे आभार. आम्ही त्वरित स्ट्रीम काढला आहे, घडल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भविष्यात अशा गोष्टींबाबत सजग राहू.' यापूर्वी 28 डिसेंबर रोजी मंत्र्यांनी याच गोष्टीसाठी झूमचे सीईओ एरिक युआन यांच्यावर हल्ला केला होता. युआन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर भारताचा चुकीचा नकाशा शेअर केला होता. त्यावर राजीव चंद्रशेखर यांनी यांनी ज्या देशांत तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, त्या देशांचे अचूक नकाशे तुम्ही वापरत असल्याची खात्री करा, असे ट्विट केले होते.

(हेही वाचा: क्रेडीट कार्ड, बँक लॉकर, आधार-पॅन लिंक यांसह अनेक नियमांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून महत्त्वाचे बदल, घ्या जाणून)

अखेर भारताच्या चुकीच्या नकाशामुळे टीकेला सामोरे जावे लागलेल्या युआनने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ते ट्विट काढून टाकले. त्यांनी लिहिले होते, - ‘मी नुकतेच एक ट्विट डिलीट केले आहे, ज्यात तुमच्यापैकी अनेकांनी नकाशाबाबत समस्या मांडल्या होत्या. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.’ दरम्यान, नुकतेच चंद्रशेखर यांनी देशातील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी कायदे, नियम आणि सुरक्षेचे पालन करण्याविषयी भाष्य केले होते. मंत्री ट्विटरवर म्हणाले- ‘मला वाटते की ट्विटरचा प्रमुख कोण आहे ही महत्त्वाची बाब नाही. ही बाब सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कायद्याचे, नियमांचे आणि सुरक्षिततेचे पालन करण्याबद्दल आहे, ज्याची रचना आणि अंमलबजावणी पारदर्शकपणे, योग्यरित्या आणि संस्थात्मकपणे करणे आवश्यक आहे.’