WhatsApp इंडियाचे प्रमुख Abhijit Bose आणि Meta पब्लिक पॉलिसीचे प्रमुख Rajiv Aggarwal यांनी दिला पदाचा राजीनामा
अभिजित बोस यांच्या राजीनाम्यानंतर, त्यांच्या पुढील योजना काय आहेत याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही, परंतु मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक राजीव अग्रवाल यांच्याबद्दल कंपनीने सांगितले की, त्यांनी एका चांगल्या संधीच्या शोधात राजीनामा दिला आहे.
इन्स्टंट मेसेजिंग अॅप-व्हॉट्सअॅपचे (WhatsApp) भारत प्रमुख अभिजित बोस (Abhijit Bose) यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अभिजीतसोबतच मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक राजीव अग्रवाल यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोन महत्वाच्या लोकांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर, कंपनीने भारतातील WhatsApp सार्वजनिक धोरणाचे संचालक शिवनाथ ठुकराल यांची भारतातील सर्व META प्लॅटफॉर्मसाठी सार्वजनिक धोरण संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
याआधी एका आठवड्यात मेटाने जगभरातील 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीने आतापर्यंत पाहिलेली ही सर्वात मोठी कर्मचारी कपात होती. या महिन्याच्या सुरुवातीला भारताचे मेटा प्रमुख अजित मोहन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ते मेटाचा प्रतिस्पर्धी स्नॅपचॅटमध्ये सामील झाले आहेत.
राजीनाम्यावर भाष्य करताना व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट म्हणाले की, ‘भारतातील व्हॉट्सअॅपचे आमचे पहिले प्रमुख म्हणून अभिजित बोस यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांच्या उद्योजकीय मोहिमेने आमच्या टीमला नाविन्यपूर्ण सेवा प्रदान करण्यात मदत केली आहे, ज्याचा लाखो लोकांना आणि व्यवसायांना फायदा झाला आहे. व्हॉट्सअॅप देशासाठी बरेच काही करू शकते आणि आम्ही भारताच्या डिजिटल परिवर्तनास मदत करण्यास उत्सुक आहोत.’ बोस यांच्या पदावर लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Elon Musk Fires Engineer Via Tweet: एलन मस्क यांच्या एका ट्विटमुळे गेली अभियंत्याची नोकरी, मुल्यांकन ठरले कारण; घ्या जाणून)
अभिजित बोस यांच्या राजीनाम्यानंतर, त्यांच्या पुढील योजना काय आहेत याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही, परंतु मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक राजीव अग्रवाल यांच्याबद्दल कंपनीने सांगितले की, त्यांनी एका चांगल्या संधीच्या शोधात राजीनामा दिला आहे. माजी दूरचित्रवाणी पत्रकार शिवनाथ ठुकराल यांची राजीव अग्रवाल यांच्या जागी सर्व META प्लॅटफॉर्मसाठी सार्वजनिक धोरण संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी व्हॉट्सअॅप पब्लिक पॉलिसीचे संचालकपद भूषवले होते. ठुकराल 2017 पासून सार्वजनिक धोरण संघाचा भाग आहेत.