Twitter चा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना दिला कायमस्वरूपी Work From Home करण्याचा पर्याय
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकालीन लॉक डाऊन (Lockdown) मुळे अनेक देशांमध्ये कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना घरातूनच काम (Work From Home) करण्याची मुभा दिली आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकालीन लॉक डाऊन (Lockdown) मुळे अनेक देशांमध्ये कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना घरातूनच काम (Work From Home) करण्याची मुभा दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध झाली नाही व या विषाणूचा प्रसार कधी रोखला जाईल हेही सांगणे कठीण आहे. या विषाणूचे संक्रमण टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सामाजिक अंतर (Social Distancing) राखणे. हे लक्षात घेता ट्विटरने (Twitter) आपल्या काही कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या कर्मचार्यांना घरातून कायमस्वरूपी काम करण्याचा पर्याय दिला आहे. याचा अर्थ असा की, आता कोविड 19 चा धोका टळल्यावरही ट्विटरचे काही कर्मचारी घरून काम करू शकतील.
डोर्सी यांनी म्हटले आहे की कोविड-19 चा उद्रेक पाहता यावर्षी सप्टेंबर महिन्यापूर्वी कंपनी आपली कार्यालये उघडण्याची शक्यता नाही. या दरम्यान सर्व प्रकारच्या व्यावसायिक भेटीही रद्द केल्या जातील. ट्विटरच्या आधी फेसबुक, अल्फाबेट (Google) आणि अन्य मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घरातून काम करण्याची मुभा देण्याचे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर कंपन्यांनी आपल्या सर्व कर्मचार्यांना या वर्षाच्या अखेरीपर्यंत घरून काम करण्यास सांगितले आहे. डोर्सी यांनी आपल्या सर्व कर्मचार्यांना मंगळवारी ई-मेलद्वारे अनिश्चित काळासाठी घरी काम करण्याचा पर्याय दिला आहे. हा पर्याय कार्यालयातील सफाई कामगार आणि देखभाल कामगारांना लागू होणार नाही, परंतु जे लोक ऑनलाइन किंवा संगणकावर काम करतात त्यांना लागू होईल. ट्विटरची नवी दिल्ली, लंडन आणि सिंगापूरसह जगभरात 35 कार्यालये आहेत. (हेही वाचा: लॉकडाऊन योग्य पद्धतीने नाही हटवला तर समस्या गंभीर- जागतिक आरोग्य संघटना)
ट्विटरने म्हटले आहे की, जर परिस्थितीने साथ दिली तर ते हळू हळू आपले एक एक कार्यालय अत्यंत काळजी व सावधगिरीने सुरु करतील. तसेच जर घरातून काम करण्यास परवानगी असलेले कर्मचारी कार्यालय उघडल्यानंतर कार्यालयात येऊ इच्छित असतील, तर त्यांचे स्वागतच असेल. जर कर्मचार्यांना घरून काम करण्यास काहीच अडचण नसेल तर त्यांना घरातूनच काम करण्याने उत्पादकतेमध्ये फरक पडत नसेल, घरातून काम करत राहणे केव्हाही चांगले.