Three-Day Work Week: 'तीन दिवसांचा कामाचा आठवडा शक्य, जीवनाचा उद्देश फक्त नोकरी नाही'- Bill Gates
त्यात आता बिल गेट्स यांनी आठवड्यातून फक्त तीन दिवस काम करण्याचा नवा पर्याय समोर ठेवला आहे.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला 70 तास काम करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर याबाबत मोठा वाद सुरू झाला. अनेकांनी मूर्तींना समर्थन दिले, तर काहींनी यावर टीका केली. आता या वादात बिल गेट्स (Bill Gates) यांनीही उडी घेतली आहे. बिल गेट्स यांनी आठवड्यातून तीन दिवस काम करण्याचा सल्ला देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. एआयची (Artificial Intelligence) मदत घेण्यावर भर देताना बिल गेट्स यांनी हा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, मशीनवर कामाचा अधिक बोजा टाकल्यास मनुष्याला आठवड्यातून तीन दिवस काम करणे सर्वोत्तम ठरेल.
जग कोरोनामधून सावरत आहे. कार्यालये सुरू झाल्याने पुन्हा एकदा आठवड्यातील कामकाजाच्या दिवसांची चर्चा सुरू झाली आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यात 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यात आता बिल गेट्स यांनी आठवड्यातून फक्त तीन दिवस काम करण्याचा नवा पर्याय समोर ठेवला आहे. बिल गेट्स हे एआयचे समर्थक आहेत. त्यांनी सुचवले की, एआयची मदत घेतल्यास सध्याच्या काळात जग तीन दिवस-आठवड्यातील कामाच्या चक्रासह भविष्याची कल्पना करू शकतो.
आजच्या काळात जिथे स्वयंपाक करण्यापासून ते इतर अनेक मोठ्या कामांपर्यंत सर्व काही मशीन करू शकते, तिथे आपली बहुतेक कामे मशीनवर सोपवून कामाचा ताण कमी केला जाऊ शकतो असे बिल गेट्स म्हणतात. 68 वर्षीय मायक्रोसॉफ्टच्या सह-संस्थापकाने त्यांच्या पॉडकास्ट 'व्हॉट नाऊ'वर दक्षिण आफ्रिकेचे कॉमेडियन आणि लेखक ट्रेव्हर नोह यांच्याशी बोलताना त्यांचे विचार शेअर केले. (हेही वाचा: Amazon to Use Waterways for Delivery: आता अॅमेझॉन अंतर्देशीय जलमार्गाने करणार पॅकेजेसची डिलिव्हरी; IWAI सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी)
एआय मानवी नोकर्या ताब्यात घेईल या सामूहिक भीतीवर गेट्स म्हणाले की, एआय नोकर्या काढून घेणार नाही परंतु त्यांना कायमचे बदलेल. बिल गेट्स यांनी त्यांच्या संभाषणात तंत्रज्ञान मानवी जीवन कसे बदलू शकते हे सांगितले. त्यांच्यामते हळू-हळू मानवी समाज एआयचा अवलंब करेल. जर हा बदल आटोपशीर गतीने झाला आणि त्याला पुरेसा सरकारी पाठिंबा मिळाला, तर तो असा समाज निर्माण करू शकेल जिथे कमी शारीरिक श्रम आवश्यक असतील आणि लोकांना अधिक मोकळा वेळ मिळेल.