Total Solar Eclipse 2026 Date: ग्रहण ही खास अवकाशीय घटना आहे. ज्यांना या अवकाशीय घटनांचे अप्रुप आहे त्यांच्यासाठी यंदाची 12 ऑगस्ट ही तारीख खास आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी खगोलप्रेमींना एका दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आल्याने, काही काळासाठी सूर्य पूर्णपणे झाकला जाईल, ज्यामुळे दिवसाही अंधार दाटून येईल. हे सूर्यग्रहण युरोप, ग्रीनलँड आणि रशियाच्या काही भागांतून दिसणार असले, तरी भारतातून ते रात्रीच्या वेळी येणार असल्याने दिसणार नाही. त्यामुळे आपोआपच भारतीयांसाठी ग्रहणासंबंधी नियम लागू राहणार नाहीत.
१२ ऑगस्ट २०२६ सूर्यग्रहणाची वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
भारतीय वेळेनुसार (IST) हे खग्रास सूर्यग्रहण १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि १३ ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजून २८ मिनिटांनी समाप्त होईल. या ग्रहणाचा परमोच्च बिंदू १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून १७ मिनिटांनी असेल.
| घटना | वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) |
|---|---|
| खंडग्रास ग्रहण सुरू | १२ ऑगस्ट, रात्री ९ वाजून ४ मिनिटे |
| खग्रास ग्रहण सुरू (जागतिक सुरुवात) | १२ ऑगस्ट, रात्री १० वाजून २८ मिनिटे |
| परमोच्च बिंदू | १२ ऑगस्ट, रात्री ११ वाजून १७ मिनिटे |
| खंडग्रास ग्रहण समाप्त | १३ ऑगस्ट, पहाटे १ वाजून २८ मिनिटे |
टीप: येथे दर्शविलेल्या वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) आहेत. हे ग्रहण भारतातून दृश्यमान नसल्याने, या वेळा जागतिक घटनांच्या स्थानिक वेळेचे भारतीय रूपांतरण दर्शवतात. विविध ज्योतिषीय आणि खगोलशास्त्रीय स्रोतांनुसार वेळेत थोडा फरक असू शकतो.
भारतातून दिसेल का आणि सूतक काळ लागू होईल का?
१२ ऑगस्ट २०२६ रोजी होणारे हे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रहणाच्या संपूर्ण कालावधीत भारतात रात्र असेल, म्हणजेच सूर्य क्षितिजाच्या खाली गेलेला असेल. धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा सूर्यग्रहण प्रत्यक्ष दिसत नाही, तेव्हा त्याचा सूतक काळ (अशुभ कालावधी) लागू होत नाही. त्यामुळे, या दिवशी भारतात कोणतेही धार्मिक निर्बंध, मंदिरांची बंदी किंवा उपवासाचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही. मंदिरे नेहमीप्रमाणे उघडी राहतील आणि दैनंदिन विधी चालू राहतील.
12 ऑगस्टचे खग्रास सूर्यग्रहण कुठे दिसणार?
हे खग्रास सूर्यग्रहण प्रामुख्याने उत्तर गोलार्धातील काही देशांमध्ये दिसेल. ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर रशिया आणि पोर्तुगालच्या काही भागांमध्ये या ग्रहणाचा थरार अनुभवता येईल. युरोपचा बहुतांश भाग, कॅनडाचा काही भाग, उत्तर अमेरिका आणि वायव्य आफ्रिकेत अंशतः सूर्यग्रहण दिसेल. स्पेनच्या काही भागांमध्ये जवळपास १०० वर्षांनंतर असे दृश्य पाहायला मिळणार आहे.
सूर्यग्रहणाचे ज्योतिषीय आणि वैज्ञानिक महत्त्व
हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला नेहमीच एक महत्त्वपूर्ण खगोलीय घटना मानले जाते. पौराणिक कथेनुसार, राहू आणि केतू या छायाग्रहांमुळे सूर्यग्रहण होते, ज्यामुळे सूर्यावर तात्पुरते सावट येते. जरी हे ग्रहण भारतातून दिसणार नसले तरी, काही ज्योतिषीय मान्यतांनुसार ग्रहणाचे सूक्ष्म ऊर्जा प्रभाव सर्व राशींवर जाणवू शकतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सूर्यग्रहण हे खगोलशास्त्रज्ञांसाठी सूर्याच्या बाहेरील वातावरण, ज्याला 'कोरोना' म्हणतात, त्याचा अभ्यास करण्याची एक दुर्मिळ संधी असते. हे ग्रहण जगातील एकमेव खग्रास सूर्यग्रहण असल्याने, वैज्ञानिक संशोधनासाठी ते महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतातून दिसणार नसले तरी, हे खग्रास सूर्यग्रहण जगभरातील खगोलशास्त्रज्ञांसाठी आणि निरीक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण घटना आहे. जे या दृश्याचे साक्षीदार होऊ शकणार नाहीत, ते ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमद्वारे हा विस्मयकारक क्षण अनुभवू शकतील.