Surya Grahan June 2020 Sutak Time: 21 जूनच्या सूर्य ग्रहणाचा सुतक काळ काय? या वेळेत काय कराल काय टाळाल?
दुपारी 12.10 मिनिटांनी सूर्यग्रहणाचा प्रभाव अधिक तीव्र होईल. मात्र या ग्रहणाचा सुतक काळ नेमका कधी? जाणून घेऊया..
Surya Grahan June 2020 Sutak Time: 21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो. या ग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीपासून जास्त लांब असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा चंद्राच्या मागून दिसते. ग्रहणाचे वेध लागल्यानंतरचा काही कालावधी सुतक काळ म्हणून पाळला जातो. 21 जून रोजी ग्रहणाची वेळ काय? आणि भारतात सुतक काळ केव्हा सुरु होणार? जाणून घेऊया. (21 जून दिवशी दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण कधी, कुठे, कसं पाहु शकाल?)
सूर्यग्रहणाची वेळ काय?
21 जून रोजी सूर्यग्रहण सकाळी 9.16 वाजता सुरु होईल आणि दुपारी 3.04 मिनिटांनी संपेल. दुपारी 12.10 मिनिटांनी सूर्यग्रहणाचा प्रभाव अधिक तीव्र होईल.
21 जून रोजी असणाऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक काळ नेमका कधी?
ग्रहणाचा सुतक काळ हा ग्रहण सुरु होण्याच्या अर्धा दिवस आधी किंवा 12 तास आधीपासून सुरु होतो आणि ग्रहणाच्या 12 तासानंतर समाप्त होतो. त्यामुळे 21 जून रोजी असणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा सुतक काळ 20 जून रोजी रात्री 9.15 मिनिटांनी सुरु होईल आणि 21 जून रोजी ग्रहण संपल्यानंतर समाप्त होईल. ग्रहणाच्या या सुतक काळात कोणतेही धार्मिक कार्य करत नाहीत. तसंच या काळात स्वयंपाक करणे टाळले जाते. अन्नावर तुळशीपत्र ठेवले जाते. काही खाणे-पिणे टाळले जाते. घरात राहण्यावर भर दिला जातो. गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते.
ग्रहणाच्या सुतक काळात अनेक मंदिरे बंद असतात. या काळात बाहेर मोठ्या प्रमाणात नकारात्मक उर्जा असते त्यामुळे घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर पडू नये. त्यांनी काही कापू-चिरु नये. शांत बसावे, नामस्मरण करावे असा सल्ला दिला जातो. अनेकजण ग्रहण सुटल्यानंतर अंघोळ करतात. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. परंतु, अनेक वर्षांपासून सुतक काळात अशा प्रकारचे रितीरिवाज पाळले जात आहेत.