अंतराळात घडला पहिला गुन्हा, नासाच्या Anne McClain ठरल्या आरोपी; पूर्व पत्नीच्या तक्रारीवरून होणार कसून चौकशी
एनी मॅकक्लेन (Anne McClain) असे या अंतराळवीराचे नाव असून, समर वॉर्डन असे त्यांच्या विभक्त झालेल्या महिला जोडीदाराचे नाव आहे.
First Crime Committed in Space: सध्या कलियुग चालू आहे. या काळात पृथ्वीवर अगणित गुन्ह्याची नोंद झाली आहे. मात्र मानवाची प्रवृत्ती कुठेही गेली तर थोडीच बदलणार? आता अंतराळातील पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. म्हणजे हा गुन्हा अंतराळात घडला आहे ज्याची आता नासाकडून (NASA) कसून चौकशी होणार आहे. नासाच्या एका महिला अंतराळवीराने अंतराळात असताना आपल्या विभक्त झालेल्या महिला जोडीदाराचे बँक खाते तपासले आहे. एनी मॅकक्लेन (Anne McClain) असे या अंतराळवीराचे नाव असून, समर वॉर्डन असे त्यांच्या विभक्त झालेल्या महिला जोडीदाराचे नाव आहे.
एनी या 6 महिन्यांसाठी अंतराळातील स्पेस सेंटरमध्ये असताना त्यांनी त्यांच्या पूर्व जोडीदाराचे बँक खाते तपासले. थोडक्यात त्यांनी वॉर्डन यांचे बँक खाते हॅक केले. यासाठी नासाकडून पुरवण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केला. वॉर्डनला हे समजताच त्यांनी ताबडतोब फेडरल ट्रेड कमिशन आणि नासाच्या इंस्पेक्टर जनरल कार्यालयात याविरोधात तक्रार दाखल केली. एनी यांनी बेकायदेशीररित्या आपले बँक खाते तपासले असा आरोप त्यांनी लावला आहे. जून महिन्यात एनी परत आल्या, त्यांनी हा गुन्हा मान्य देखील केला आहे. (हेही वाचा: Asteroid 'God of Chaos' पासून पृथ्वीला धोका, जग विनाशाच्या उंबरठ्यावर, एलोन मस्क याने दिला 'No Defence' इशारा, जाणून घ्या काय आहे 'डूमर्सडे अलर्ट')
मॅकक्लेन आणि वॉर्डन 2014 साली विवाहबंधनात अडकल्या होत्या. त्यानंतर सतत भांडणे होऊ लागण्याने त्यांनी विभक होण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये त्यांनी यासाठी अर्ज केला. मात्र त्यांना एक मुलगा आहे. या मुलाच्या संगोपनासाठी वॉर्डन यांच्या खात्यात पुरेसा पैसा आहे का नाही, हे पाहण्यासाठी आपण ते बँक खाते तपासले असल्याची माहिती मॅकक्लेन यांच्या वकिलाने दिली आहे. मॅकक्लेन अंतराळात गुन्हा केल्याचा आरोप असलेली पहिली अंतराळवीर आहे. नासा या गोष्टीची कसून चौकशी करणार आहे.