Eclipses of 2020: भारतीय खगोलप्रेमींसाठी आगामी वर्षभरात 6 ग्रहणं, सुपरमून, ब्ल्यू मून अनुभवता येणार; पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारी दिवशी!

त्यामुळे तुम्ही खगोलप्रेमी असाल तर वर्ष 2020 मधील अवकाशात दिसणार्‍या विलोभनीय दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असाल तर आजच पुढील वर्षभरातील या तारखा राखून ठेवा.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

Eclipses of 2020 in India: आज 2020 या नव्या वर्षाची सुरूवात झाली आहे. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार दर चार वर्षांनी लीप इयर येते. आजपासून सुरू झालेले नवं वर्ष हे लीप इयर आहे. या वर्षात 366 दिवस आहेत. त्यामुळे सणांची, विवाह मुहूर्तांची ते खगोलीय घटनांची मोठी चंगळ आहे. या वर्षात एकूण सहा ग्रहणं, सुपर मून दर्शन, ब्ल्यू मून योग देखील आहेत. त्यामुळे तुम्ही खगोलप्रेमी असाल तर वर्ष 2020 मधील अवकाशात दिसणार्‍या विलोभनीय दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असाल तर आजच पुढील वर्षभरातील या तारखा राखून ठेवा.

2020 मधील चंद्र आणि सूर्य ग्रहणं

नवं वर्ष 2020 मध्ये दोन सूर्यग्रहणं आणि चार चंद्रग्रहणं आहेत.

10 जानेवारी -चंद्र ग्रहण भारतातून दिसणार आहे.

21 जानेवारी - कंकणाकृती सूर्यग्रहण पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड मध्ये दिसेल तर इतरत्र खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

5 जून - चंद्र ग्रहण भारतातून दिसणार आहे.

5 जुलै - चंद्र ग्रहण भारतातून दिसणार नाही.

30 नोव्हेंबर - चंद्र ग्रहण भारतातून दिसणार नाही.

14 डिसेंबर - खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

2020 मधील सुपर मून, ब्ल्यू मून योग कधी?

7 एप्रिल दिवशी भारतीयांना सुपरमूनचे दर्शन होणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र 3 लाख 56 हजार 907 किमी. इतका पृथ्वीच्याजवळ आल्याने 14 टक्के मोठा व जास्त तेजस्वी दिसणार आहे. 2020 मध्ये 1 व 31 ऑक्टोबर दिवशी पौर्णिमा असल्याने या दिवशी ‘ब्ल्यू मून' योग आला आहे.

दरम्यान भारतीयांच्या मनात ग्रहण या संकल्पनेबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. त्यामुळे त्याच्याकडे खगोलीय आविष्कारातून पाहण्यापेक्षा अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून अनेकदा पाहिलं जाते. पण आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही हे जुने विचार मागे टाकून नव्या दृष्टिकोनाचा स्विकार करणार असाल तर या ग्रहणाच्या तारखा नक्की लक्षात ठेवा.