Comet NEOWISE to Be Visible in India: भारतामध्ये आजपासून 20 दिवस उघड्या डोळ्यांनी होणार C/2020 F3 या धुमकेतूचे दर्शन; जाणून घ्या कुठे व कसा पाहाल
मार्च महिन्यात नासाच्या टेलीस्कोपने शोधून काढलेले NEOWISE, 22-23 जुलै रोजी पृथ्वीच्या जवळ येण्याची शक्यता आहे
सध्या खगोलशास्त्र विषयामध्ये रुची घेणाऱ्या लोकांकडे आकाशात पाहून विविध गोष्टींचा अभ्यास करण्याची अनेक कारणे आहेत. आता नासाच्या (NASA) निअर-अर्थ ऑब्जेक्ट वाईड-फील्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर टेलिस्कोप (Near-Earth Object Wide-field Infrared Survey Explorer Telescope) नी शोधलेला सी/2020 एफ 3 नीओडई (C/2020 F3 NEOWISE) नावाचा एक नवीन धूमकेतू (Comet) 14 जुलैला उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. याबाबत नासाचे अंतराळवीर बॉब बेहनकने (Bob Behnken) गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून एक ट्विट केले होते, ज्यामध्ये धूमकेतू पृथ्वीच्या वक्रजवळ चमकत असलेला दिसत आहे.
याबाबत ओडिशाच्या पठानी समंता प्लॅनेटेरियमचे उपसंचालक डॉ. सुभेन्दु पट्टनाईक म्हणाले की, ‘आजपासून 20 दिवसांपर्यंत भारतातील लोकांना दररोज सुमारे 20 मिनिटे हा धूमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. मार्च महिन्यात नासाच्या टेलीस्कोपने शोधून काढलेले NEOWISE, 22-23 जुलै रोजी पृथ्वीच्या जवळ येण्याची शक्यता आहे. मात्र, आजपासून ते उत्तर-पश्चिम आकाशात दिसेल.’ पुढे पट्टनाईक म्हणाले, '14 जुलैपासून C/2020 F3, हा धूमकेतू उत्तर-पश्चिम आकाशात स्पष्टपणे दिसेल. पुढील 20 दिवस सूर्यास्तानंतर सुमारे 20 मिनिटे तो दिसू शकेल व लोक उघड्या डोळ्यांनी त्याचे निरीक्षण करू शकतात.' (हेही वाचा: भारतासह जगभरात अनेक वेळा दिसली उडती तबकडी; वर्ल्ड यूएफओ डे निमित्त घ्या जाणून)
तुम्ही हे दृश्य दुर्बिणीच्या सहाय्याने पाहू शकता. जुलै नंतर तो फेव्हायला सुरुवात होईल व त्यानंतर तो उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य होणार नाही. तर असा हा नेत्रदीपक स्वर्गीय सोहळा पाहण्यासाठी आपण शहरापासून दूर, जिथे लाईट्स नसतील अशी जागा निवडू शकता. NEOWISE, पृथ्वीपासून सुमारे 200 दशलक्ष किलोमीटर अंतरावरुन अंतराळातून आले आहे. 22 जुलै रोजी, पृथ्वीच्या बाहेरील कक्षा ओलांडताना ते 64 दशलक्ष मैल किंवा 103 दशलक्ष किलोमीटरच्या अंतरावर आपल्या ग्रहाच्या सर्वात जवळ असेल. नासाच्या मते, धूमकेतू सुमारे 5 कि.मी. रुंद आहे आणि त्याचे केंद्रबिंदू सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सौर मंडळाच्या जन्माच्या तयार होण्यापासून उरलेल्या गडद कणांनी व्यापलेला आहे. हा धूमकेतू पुढच्या वेळी 600 वर्षांनतर पृथ्वीवरून दृश्यमान होईल.