OnePlus Nord 2 चा पुन्हा एकदा मोठा स्फोट; जळाली युजरची मांडी, कंपनी म्हणते... (See Photos) 

OnePlus Nord 2 मध्ये नक्की का ब्लास्ट होत आहे हे अद्याप समजू शकलेले नाही, परंतु याआधी आणखी एका OnePlus Nord 2 ला आग लागल्यानंतर कंपनीने युजरचा दावा खोटा असल्याचे सांगितले होते

oneplus nord 2 5G (Pic Credit - Amazon India)

OnePlus पूर्वी फक्त प्रीमियम स्मार्टफोन ऑफर करत असे परंतु गेल्या वर्षी कंपनीने मिडरेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रवेश केला. OnePlus Nord सह मिडरेंज मार्केटमध्ये OnePlus ची दणदणीत एंट्री झाली. परंतु त्यानंतर या सीरिजच्या फोनमध्ये इतक्या अडचणी येऊ लागल्या की कोणी कल्पनाही केली नसेल. OnePlus Nord 2 भारतात या वर्षी जुलैमध्ये लॉन्च करण्यात आला आणि तेव्हापासून OnePlus Nord 2 चा ब्लास्ट होण्याच्या सतत तक्रारी येत आहेत.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा वापरकर्ता OnePlus Nord 2 मध्ये आग लागल्याची तक्रार करतो तेव्हा कंपनी आगीच्या कारणासाठी वापरकर्त्याला जबाबदार धरते. आता आणखी एका OnePlus Nord 2 चा ब्लास्ट झाल्याची माहिती मिळत आहे.

सुहित शर्मा नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विट केले आहे की, OnePlus Nord 2 चा ब्लास्ट झाला असून त्यामुळे एका मुलाची मांडी भाजली आहे. सुहितने या घटनेचे फोटोही शेअर केले आहेत ज्यात मुलाच्या मांडीवरील जखमा दिसत आहेत. युजरच्या जीन्सचा खिसा जळाल्याचेही फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. एकंदरीत फोटो पाहता हा फार मोठा अपघात असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणावर, कंपनीने आधीच्याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला आहे की, आपण अशा घटनांना गांभीर्याने घेतो आहोत. कंपनी वापरकर्त्यांशी संपर्क साधत आहे आणि प्रकरणाची चौकशी करत आहे. वनप्लस नॉर्ड 2 मध्ये ब्लास्ट होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत आणि प्रत्येक वेळी कंपनी तेच उत्तर देत आहे. (हेही वाचा: धक्कादायक! Xiaomi कंपनीच्या फोनचा खिशात स्फोट, कव्हरमुळे मोठी हानी टळली)

OnePlus Nord 2 मध्ये नक्की का ब्लास्ट होत आहे हे अद्याप समजू शकलेले नाही, परंतु याआधी आणखी एका OnePlus Nord 2 ला आग लागल्यानंतर कंपनीने युजरचा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. OnePlus Nord 2 भारतात 27,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.