केबल टीव्हीसाठी TRAI चे नवे नियम: कसे निवडाल स्वस्त आणि मस्त चॅनल्स पॅक्स?
चॅनलची निवड करण्यापूर्वी बेस पॅक कोणते असते, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अलिकडेच केबल टीव्ही प्रेक्षकांसाठी नवे नियम सुरु केले आहेत. ट्रायच्या नव्या नियमानुसार, तुम्ही जे चॅनल्स पाहता त्याच चॅनल्सचे चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. यानुसार प्रत्येक चॅनल्ससाठी फेअर प्रायसिंग मॉड्ल्स लागू करण्यात आले आहे. ट्रायचे हे नवे नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. त्यापूर्वी जाणून घेऊया स्वस्त आणि मस्त चॅनल्स पॅकची निवड कशी करायची?
बेस पॅक
चॅनलची निवड करण्यापूर्वी बेस पॅक कोणते असते, हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण बेस पॅक घेणे, हे ग्राहकांसाठी अनिवार्य आहे. या बेस पॅकमध्ये 100 नॉन-एचडी फ्री टू एअर चॅनल्स फ्री मिळतील. बेस पॅकची किंमत 130 रुपये आहे. याशिवाय टॅक्स वेगळे द्यावे लागतील. डिटीएच सेवा देणारी कंपनी एअरटेलच्या बेस पॅकची किंमत 99 रुपये आहे.
बुकेट पेड चॅनल्स
बेस पॅक शिवाय तुम्ही अधिक चॅनल्सची निवड करु शकता. या सर्व पेड चॅनल्सचे मासिक किंमत ठरलेली आहे. हे सर्व चॅनल्स कॉम्बो मध्ये घेतल्यास यावर डिस्काऊंट मिळेल. हे चॅनल्स तुम्ही भाषा आणि ठिकाणानुसार निवडू शकता. हे चॅनल्स तुम्ही बेस पॅकसह जोडू शकता. एकत्र 9 बुकेट चॅनल्स सब्सक्राईब करणे हे अधिक स्वस्त पडते.
चॅनल्सची निवड
बेस पॅक आणि बुकेट पॅकमध्ये आपल्या आवडीचे चॅनल्स निवडणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या मासिक बजेटनुसार एसडी किंवा एचडी चॅनल्सची निवड करु शकता. काही ब्रॉडकास्टर्सच्या यादीत 535 फ्री-टू-एअर चॅनल्स आणि 330 पेड चॅनल्स रजिस्टर आहेत. त्यामुळे या चॅनल्सची निवड करण्यापूर्वी तुम्हाला कोणते चॅनल्स पाहायला आवडेल, तुमचे मासिक बजेट काय आहे, हे ठरवा. त्यामुळे चॅनल्सची निवड करणे सोपे होईल.
31 जानेवारी अंतिम तारीख
प्रेक्षकांना आपल्या आवडीचे चॅनल्स निवडण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने 31 जानेवारी ही अंतिम तारीख दिली आहे. 31 जानेवारी 2019 तुम्ही या चॅनल्सची निवड करु शकता. जर तुम्ही तुमच्या आवडीचे चॅनल्सची निवड न केल्यास तुम्हाला फक्त बेस पॅक मिळेल. पॅकची निवड करण्यासाठी तुम्हाला केबल ऑपरेटर्स किंवा डिटीएच सर्व्हिस प्रॉव्हायडर्सशी संपर्क करावा लागेल.