Mini App Store: Google ला टक्कर देण्यासाठी Paytm ची नवी खेळी; बाजारात आणले मिनी अ‍ॅप स्टोअर, जाणून घ्या वैशिष्ट्ये

गुगलने पेटीएमला प्ले स्टोअरमधून काही काळ काढून टाकले होते, त्यानंतर आता पेटीएमने स्वतःचे अ‍ॅप स्टोअर लॉन्च केले आहे. आतापर्यंत मार्केटवर मुख्यत्वे गुगलचे वर्चस्व होते

Paytm (Photo Credits: ANI)

गुगलशी (Google) स्पर्धा करण्यासाठी पेटीएमने (Paytm) सोमवारी भारतीय डेव्हलपर्ससाठी एक मिनी अ‍ॅप स्टोअर (Mini App Store) बाजारात आणले. गुगलने पेटीएमला प्ले स्टोअरमधून काही काळ काढून टाकले होते, त्यानंतर आता पेटीएमने स्वतःचे अ‍ॅप स्टोअर लॉन्च केले आहे. आतापर्यंत मार्केटवर मुख्यत्वे गुगलचे वर्चस्व होते, परंतु पेटीएमच्या मिनी अ‍ॅप स्टोअरच्या सहाय्याने वापरकर्त्यांना गुगल प्ले स्टोअर व्यतिरिक्त इतर पर्यायही उपलब्ध झाला आहे. 1MG, NetMeds, Decathlon Domino’s Pizza, FreshMenu आणि NoBroker यासह 300 हून अधिक अ‍ॅप्स वेबसाइटवर दिसत आहेत.

पेटीएमच्या अँड्रॉइड मिनी अ‍ॅप स्टोअरचा अ‍ॅप डेव्हलपर आणि ब्रँडलाही फायदा होईल कारण त्याची पोहोच आणि वितरण खूप जास्त आहे. पेटीएमने आपल्या वेबसाईटवर नमूद केले आहे की, मिनी अ‍ॅप स्टोअर HTML आणि जावास्क्रिप्ट सारख्या मुक्त स्त्रोत तंत्रज्ञानास इंटीग्रेट करेल आणि याचा पेटीएम अ‍ॅपच्या 15 कोटी सक्रिय वापरकर्त्यांना एक्सेस देईल. पेटीएमचे म्हणणे आहे की, डेव्हलपर पेटीएम व्होल्ट आणि यूपीआयच्या माध्यमातून शून्य टक्के पेमेंट चार्जवर या प्लॅटफॉर्मवर अॅप्सचे वितरण करू शकतात. क्रेडिट कार्डद्वारे हे करण्यासाठी अॅप डेव्हलपर्स 2 टक्के शुल्क भरावे लागेल.

पेटीएम मिनी अ‍ॅप स्टोअरमध्ये अॅनालिटिक्स डेव्हलपर डॅशबोर्डसह वेगवेगळ्या मार्केटिंग टूल साधनांसह पेमेंट कलेक्शन पर्याय देखील आहे. मिनी अ‍ॅप स्टोअरवर मिनी अ‍ॅप्स उपलब्ध असतील, ज्याचा इंटरफेस मोबाइल अॅप सारखाच असेल. मिनी अ‍ॅप्स एक प्रकारचा कस्टम बिल्ड मोबाइल वेब आहे, जो वापरकर्त्यांना डाउनलोड न करता अॅप सारखा अनुभव देतो. (हेही वाचा: WhatsApp वर लवकरच येणार धमाकेदार फिचर्स, युजर्सचा चॅटिंग करण्याचा अंदाज बदलणार)

याबाबत पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी कंपनी 'पेटीएम मिनी अ‍ॅप डेव्हलपर कॉन्फरन्स' घेणार आहे. निवडक वापरकर्त्यांसाठी पेटीएमचा अ‍ॅप स्टोअर बीटामध्ये काही काळ उपलब्ध होता. हे अॅप युजर्सना खूप आवडले आणि त्यांना सप्टेंबरमध्ये 12 दशलक्ष व्हिजीट्स मिळाल्या.