LinkedIn to Introduce Gaming: लवकरच 'लिंक्डइन' या लोकप्रिय जॉब सर्च प्लॅटफॉर्मवर खेळू शकाल गेम्स; युजर्सनी व्यासपीठावर अधिक वेळ घालवण्यासाठी कंपनीची भन्नाट आयडिया
मायक्रोसॉफ्ट लिंक्डइनच्या गेमिंग प्रोजेक्टमध्ये काय समाविष्ट आहे हे देखील प्रवक्त्याने सांगितले नाही.
LinkedIn to Introduce Gaming: गेमिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. लोकांच्या हातात फोन आल्यापासून गेमिंगची क्रेझ आणखीनच वाढली आहे. फेसबुकसारख्या सोशल मीडियावरही या गेमचा वेगळा विभाग तयार करण्यात आला होता. अशात आता गेमिंग आणखी एका नवीन प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइन (LinkedIn) हे प्रामुख्याने जॉब सर्च प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. मात्र आता प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी कंपनी आता आपल्या सेवांमध्ये गेमिंग जोडण्याचा विचार करत आहे.
टेक क्रंचच्या अहवालानुसार , वापरकर्त्यांना लिंक्डइनवर अधिक वेळ घालवता यावा यासाठी कंपनी त्यात काही गेम जोडणार आहे. हे गेम्स कोडे आणि शब्द-आधारित असतील. सुरुवातीला वापरकर्त्यांना लिंक्डइनवर Queens, Inference आणि Crossclimb नावाचे 3 गेम मिळतील.
लिंक्डइनच्या प्रवक्त्याने देखील पुष्टी केली आहे की, कंपनी गेमिंगवर काम करत आहे, परंतु गेमच्या लॉन्च तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मायक्रोसॉफ्ट लिंक्डइनच्या गेमिंग प्रोजेक्टमध्ये काय समाविष्ट आहे हे देखील प्रवक्त्याने सांगितले नाही. कंपनी लवकरच आपल्या यूजर्ससाठी हे गेम्स रोल आउट करू शकते.
आपल्या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात लिंक्डइनने गेल्या काही वर्षांत अनेक नवीन फीचर्स सादर केली आहेत. आता लवकरच मोबाईल वापरकर्ते तसेच वेब वापरकर्ते लिंक्डइनवर उपलब्ध होणारे गेम सहज खेळू शकतील. लिंक्डइन गेमिंगसह चाचणी करत आहे. मात्र, कंपनीच्या गेमिंग प्रकल्पात मायक्रोसॉफ्टचाही सहभाग आहे की नाही हे लिंक्डइनने सांगितले नाही.
(हेही वाचा: Dell: डेल कंपनी घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार नाही प्रमोशन, ऑफिसला बोलावण्यासाठी नवे धोरण)
दरम्यान, मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग व्यवसायात, ज्यामध्ये Xbox आणि ऍक्टीव्हिजन ब्लिझार्ड (Activision Blizzard) चा समावेश आहे व गेल्या तिमाहीत त्यांनी $7.1 अब्ज कमाई नोंदवली आहे. मायक्रोसॉफ्टने 13 ऑक्टोबर 2023 रोजी गेमिंग कंपनी ऍक्टीव्हिजन ब्लिझार्डचे अधिग्रहण केले. मायक्रोसॉफ्टने सांगितले की ऍक्टीव्हिजन ब्लिझार्डच्या अधिग्रहणामुळे महसूल $2 अब्जने वाढला आहे.