Jio 5G Network: 'दिवाळीपर्यंत मुंबईमध्ये येणार 5G नेटवर्क, डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतात सुरु होईल सेवा'- Mukesh Ambani
4G च्या 100 Mbps च्या तुलनेत 5G वर इंटरनेटचा वेग 10 Gbps पर्यंत पोहोचू शकतो. हे तुमच्या 5G कव्हरेजवर अवलंबून असेल आणि डाउनलोडची गती 1Gbps ते 10Gbps पर्यंत असू शकते.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी जाहीर केले की, जिओ (Jio) डिसेंबर 2023 पर्यंत सर्व भारतीयांसाठी 5G सेवा घेऊन येईल. यासह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह मुंबईतील नागरिकांना दिवाळीपर्यंत हे अपग्रेड मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत इंडियन मोबाइल काँग्रेस (IMC) 2022 च्या सहाव्या आवृत्तीला संबोधित करताना अंबानी म्हणाले की, जिओ हे सुनिश्चित करेल की, ‘डिसेंबर 2023 पर्यंत प्रत्येक गाव 5 जी सेवेचा आनंद घेईल, कारण जिओने 5 जी रोल आउट सुरू केला आहे.’
रिलायन्स जिओ दिवाळीपर्यंत देशातील निवडक शहरांमध्ये स्टँडअलोन 5G सेवा सुरू करेल. संपूर्ण भारतात 5G नेटवर्क तयार करण्यासाठी, जिओने एकूण 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुरुवातीला, जिओ दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार मेट्रो शहरांमध्ये 5G सेवा सुरू करेल. डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशाचा समावेश करण्यासाठी ते टप्प्याटप्प्याने इतर शहरे आणि शहरांमध्ये विस्तारित केले जातील.
जिओची 5G सेवा ही प्रत्येकाला, प्रत्येक ठिकाणाला आणि प्रत्येक गोष्टीशी उच्च दर्जाच्या आणि परवडण्याजोग्या नेटवर्कने जोडेल. आम्ही चीन आणि अमेरिकेच्याही पुढे भारताला डेटा-शक्तीवर चालणारी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे अंबानी म्हणाले. जिओ 5G हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रगत 5G नेटवर्क असेल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: 5G Mobile Phones: भारतात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ; आजच खरेदी करा बजेट फ्रेंडली 5G मोबाईल)
स्टँडअलोन 5G सह, जिओ कमी विलंब, मोठ्या प्रमाणात मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, 5G व्हॉइस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाइसिंग आणि मेटाव्हर्स सारख्या नवीन आणि शक्तिशाली सेवा देऊ शकते. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 5G सेवेची मोठी भेट दिली. 4G च्या 100 Mbps च्या तुलनेत 5G वर इंटरनेटचा वेग 10 Gbps पर्यंत पोहोचू शकतो. हे तुमच्या 5G कव्हरेजवर अवलंबून असेल आणि डाउनलोडची गती 1Gbps ते 10Gbps पर्यंत असू शकते.