आयफोन निर्माता Apple बनली 2 ट्रिलियन डॉलर्स मार्केट व्हॅल्यूपर्यंत पोहोचणारी पहिली अमेरिकन कंपनी

यासह हे स्थान मिळविणारी Apple ही अमेरिकेची पहिली कंपनी ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी कंपनीने 1 ट्रिलियन डॉलर्सची मार्केट कॅप मिळविली होते. बुधवारी सकाळी नॅस्डॅकवर व्यापारा दरम्यान,

Apple iPhone. (Photo Credits: IANS)

अॅपल (Apple) या दिग्गज टेक कंपनीची मार्केट कॅप (Market Cap) 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. यासह हे स्थान मिळविणारी Apple ही अमेरिकेची पहिली कंपनी ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी कंपनीने 1 ट्रिलियन डॉलर्सची मार्केट कॅप मिळविली होते. बुधवारी सकाळी नॅस्डॅकवर व्यापारा दरम्यान, Apple चे शेअर्स 467.77 डॉलर्सपर्यंत पोहोचले आणि त्यासह कंपनीची बाजारपेठ 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली. आयफोन (IPhone) बनवणारी ही कंपनी 12 डिसेंबर 1980 रोजी सार्वजनिक झाली होती आणि तेव्हापासून कंपनीचे शेअर्स 76,000 टक्क्यांनी वाढले आहेत.

कोरोना व्हायरस धोका व त्यानंतर आयफोन तयार करणारे चीनमधील कारखाने बंद पडल्यानंतरही, Apple चे शेअर्स जवळपास 60 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचा स्वतःचा प्रचंड विश्वासू ग्राहक बेस आहे, ज्यांचा कंपनीच्या उत्पादनांवर इतका विश्वास आहे की, लॉक डाऊनमध्येही Apple ची अनेक उत्पादने विकली गेली.

Apple ची स्थापना स्टीव्ह जॉब्स यांनी 1976 मध्ये वैयक्तिक संगणकांची विक्री करण्यासाठी केली होती आणि आता या कंपनीने बाजारात 2 ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅप प्राप्त केले आहे. ही रक्कम अमेरिकेच्या मागील वर्षाच्या कर संकलनाच्या अर्ध्या रकमेपेक्षा थोडी जास्त आहे. Apple ने दोन वर्षांपूर्वी 1 ट्रिलियन डॉलर्सची मार्केट कॅप सध्या केली होती. (हेही वाचा: Samsung कंपनीचा मोठा निर्णय; भारतामध्ये 5 वर्षांत बनवणार 3.7 लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन)

जगाविषयी बोलायचे झाले तर Apple ही 2 ट्रिलियन डॉलर्सची मार्केट कॅप मिळवणारी पहिली कंपनी नाही. गेल्या वर्षी शेअर सार्वजनिक होताच सौदी अरामको (Saudi Aramco) ने 2 ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅप प्राप्त केले होते. दरम्यान, Apple सोबत Amazon, Microsoft आणि Google ची मूळ कंपनी Alphabet च्या मार्केट कॅपिटलायझेशनला जोडल्यास, ते अंदाजे 6 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ अन्य तीन कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन देखील सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स किंवा त्याहून अधिक आहे.