IIT Bombay Placements: आयआयटी बॉम्बेचे प्लेसमेंट सत्र संपन्न; केवळ 75% लोकांना मिळाल्या नोकऱ्या, किमान वार्षिक पॅकेज 4 लाखांवर घसरले

कॅम्पस ड्राइव्हद्वारे सुमारे 75% विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक भरती झाली आहे.

Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

IIT Bombay Placements: देशातील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) चे प्लेसमेंट सत्र 2024 संपन्न झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पॅकेज वाढले असले तरी, काही आव्हानेही उभी राहिली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे. तसेच, यंदाचे पॅकेज आतापर्यंतचे सर्वात कमी आहे. पूर्वी जे 6 लाख रुपये होते ते यावर्षी 4 लाख रुपये झाले आहे. अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या 21.8 लाख रुपयांच्या तुलनेत, यावर्षी सरासरी वार्षिक पॅकेज 7.7% ने वाढून 23.5 लाख रुपये झाले आहे.

या प्लेसमेंट सत्रात 388 कंपन्यांनी नोंदणी केली आणि 364 कंपन्यांनी ऑफर दिल्या. कॅम्पस ड्राइव्हद्वारे सुमारे 75% विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक भरती झाली आहे. तसेच 78 आंतरराष्ट्रीय ऑफर स्वीकारण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, देशातील 775 विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ऑफर दिली आहे, तर 622 विद्यार्थी भारतीय कंपन्यांमध्ये सामील होणार आहेत.

अनेक विद्यार्थ्यांना 1 कोटींहून अधिक किमतीचे पॅकेज मिळाले आहेत. दहा विद्यार्थ्यांनी 4 लाख ते 6 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह नोकरीच्या ऑफर स्वीकारल्या आहेत. सल्लागार क्षेत्रात गेल्या वर्षीपेक्षा कमी भरती झाली आहे. वित्तीय सेवा क्षेत्रात 33 कंपन्यांनी 113 ऑफर दिल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, प्रॉडक्ट मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रातही भरती झाली आहे. शिक्षण क्षेत्रात केवळ 11 कंपन्यांनी सहभाग घेतला. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ऑटोमेशन, एनर्जी सायन्स यासारख्या क्षेत्रातही भरती झाली आहे. (हेही वाचा: Generative AI Adoption मुळे नोकर कपात होणार नाही, Infosys CEO Salil Parekh यांची ग्वाही)

अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता प्लेसमेंटची टक्केवारी सुमारे 75 टक्के आहे. युक्रेनमधील युद्ध आणि सुस्त जागतिक अर्थव्यवस्थेमुळे, यंदा कमी आंतरराष्ट्रीय भर्ती झालेली दिसून आली. प्लेसमेंट हंगामाचा दुसरा टप्पा संथ होता, परंतु एप्रिलनंतर त्याने वेग घेतला. दुसऱ्या टप्प्यात 300 हून अधिक जॉब ऑफर मिळाल्या आहेत.