कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा ट्रॅक ठेवण्यासाठी भारत सरकारने लाँच केले ‘आरोग्य सेतू' App; आजूबाजूच्या परिसरातील Coronavirus पेशंट्सची मिळणार माहिती
मात्र, आता सरकारने आरोग्य सेतु
कोरोनो व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावाबद्दल जनजागृती करण्यासाठी भारत सरकारने याआधी MyGov अॅप सादर केले होते. मात्र, आता सरकारने आरोग्य सेतु (Aarogya Setu) नावाचे कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अॅप बाजारात आणला आहे. हे अॅप आपण स्मार्टफोनचे लोकेशन आणि ब्लूटूथसह वापरू शकता. या अॅपमुळे तुम्ही कोरोना बाधित रुग्णाच्या आजूबाजूला आहात की नाही हे समजेल. हे अॅप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (NIC) ने विकसित केले आहे.
लोकांना कोरोनाबद्दल जागरूक करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक अॅप्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आता सादर करण्यात आलेले आरोग्य सेतु हे अॅप लोकांना त्यांना कोरोना विषाणूचा धोका आहे की नाही हे ओळखण्यास मदत करेल. गॅझेट्स 360 च्या अहवालानुसार, सध्या हे अॅप हिंदी आणि इंग्रजीसह 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. याचा वापर करण्यासाठी ब्लूटूथ आणि फोनचे लोकेशन आवश्यक आहे. आरोग्य सेतु अॅप वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाइल क्रमांकासह नोंदणी करावी लागेल.
आपण कोरोना बाबत हाय रिस्क क्षेत्रात असल्यास हे अॅप आपल्याला जवळच्या प्रयोगशाळेत जाण्यासाठी तसेच, टोल-फ्री नंबर 1075 वर कॉल करण्याचा सल्ला देईल. याशिवाय आरोग्य सेतू अॅप कोरोनो व्हायरसशी लढण्याबाबतही माहिती देईल. इतकेच नाही तर आपण कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास किंवा सकारात्मक रूग्णाच्या संपर्कात असाल, तर हा अॅप आपला डेटा सरकारला शेअर करेल. मात्र कोणत्याही थर्ड पार्टीला ही माहिती दिली जाणार नाही. आरोग्य सेतु मोबाइल अॅपमध्ये एक चॅटबॉट आहे, जो वापरकर्त्यांना या विषाणूशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. तसेच वापरकर्त्यांमध्ये या विषाणूची लक्षणे आहेत की नाही हे देखील सांगेल.