वाह! घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना Google देणार 75 हजाराचा भत्ता; Work From Home करताना लॅपटॉप, फर्निचर विकत घेण्यासाठी मदत
मार्चपासून ग्लोबल लॉकडाउन (Lockdown) सुरू झाल्यानंतर जवळजवळ सर्व कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली.
कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या आजारामुळे, आज जगातील बहुतेक सर्व लोक घरातून काम करत आहेत. मार्चपासून ग्लोबल लॉकडाउन (Lockdown) सुरू झाल्यानंतर जवळजवळ सर्व कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली. यामध्ये गुगल (Google) सारखी मोठी कंपनीही सहभागी होती. आता जुलैपासून गुगल आपल्या कर्मचार्यांच्या कार्यालयात बोलावण्यास सुरुवात करणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, घरातून काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला गुगल, भत्ता म्हणून एक हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 75 हजार रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मंगळवारी कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 6 जुलै रोजी कंपनी वेगवेगळ्या शहरांमध्ये 10 टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालये उघडण्याची प्रक्रिया सुरू करेल. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर 30 टक्के कर्मचार्यांना सप्टेंबरपर्यंत कार्यालयात बोलावले जाईल. गुगलने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, या दरम्यान जे कर्मचारी घरून काम करतील त्यांना कंपनीकडून भत्ता स्वरूपात 1000 डॉलर्स दिले जातील. घरातून काम करण्यासाठी लोकांना लॅपटॉप, फर्निचर व इतर उपकरणे लागतील, त्यासाठी हे पैसे देण्यात येणार आहेत असे कंपनीने म्हटले आहे. (हेही वाचा: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अॅप')
या वर्षभरात बहुतांश कर्मचार्यांना घरून काम करावे लागणार आहे, अशा परिस्थितीत गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये याची काळजी घेत आहे. दरम्यान, गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, कंपनी यावर्षी मर्यादित संख्येने ज्यांनी गरज आहे अशा कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात बोलावणार आहे. या कर्मचार्यांनाही रोटेशनवर कार्यालयात बोलावले जाईल. दरम्यान, भारतामध्ये कोरोना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता, 25 मार्चपासून लॉक डाऊन सुरु करण्यात आले आहे. लॉकडाऊन असूनही, देशात सुमारे दीड लाख रुग्ण आढळून आले आहेत.