Video: अंतराळातील पहिले हॉटेल; 12 दिवस, दिवसाला 6 कोटी, 24 तासांमध्ये पहा 16 वेळा सूर्योदय

या हॉटेलमध्ये 2021 पासून पाहुण्यांसाठी वास्तव्याची सुविधा उपलब्ध होतील.

Aurora Station (Photo Credit : Youtube)

First Luxury Space Hotel: तंत्रज्ञान क्षेत्रात होणारी क्रांती अक्षरशः थक्क करणारी आहे. आता अजून एक पाऊल पुढे जाऊन शास्त्रज्ञांनी एक मोठी अचंबित करणारी गोष्ट केली आहे. अमेरिकातल्या ओरियन स्पॅन कंपनीने अंतराळात एक अलिशान हॉटेल उभारत असल्याची घोषणा केली आहे. या हॉटेलमध्ये  2021 पासून पाहुण्यांसाठी वास्तव्याच्या सुविधा उपलब्ध होतील. औरोरा स्टेशन (Aurora Station) असे या हॉटेलला नाव देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या हॉटेलसाठी बुकिंग सुरु झाले होते, आणि बघता बघता पुढच्या कैक महिन्यासाठी हे हॉटेल पूर्णतः बुक झालेही आहे.

हे हॉटेल पृथ्वीपासून अंतराळात 200 मैल उंचीवर असणार आहे. हे हॉटेल 35 फूट लांब आणि 12 फूट रूंदीचे आहे. एखाद्या अलिशान हॉटेलमध्ये असतात अशा सुविधा या हॉटेलमध्ये पुरवल्या जाणार आहेत. यामध्ये वाय फायचा देखील समावेश आहे. पृथ्वीवरून या हॉटेलमध्ये राहून परत येण्यासाठी 12 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे पर्यटक हॉटेलमधून 24 तासांमध्ये 16 वेळा सूर्योदय व सूर्यास्त पाहू शकतील. याचे कारण म्हणजे हे हॉटेल 90 मिनिटांमध्ये पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करील. याठिकाणी पर्यटक शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत (तरंगत!) राहू शकतील. या हॉटेलात पर्यटकांना नेण्यापूर्वी त्यांना दोन वर्षे योग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. (हेही वाचा : आता चक्क चंद्रावर होणार कापूस आणि बटाट्याची शेती; चीनी संशोधकांच्या प्रयत्नांना यश)

खर्चाच्या बाबतील बोलायचे झाले तर, या हॉटेलमध्ये राहण्यासाठी एका दिवसाला तब्बल साडेपाच कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये इतर अनेक सुविधा, स्लीपिंग पॉड्स आणि उच्च गुणवत्तेचे अंतराळ खाद्य उपलब्ध असेल. डेनिस टिटो या अब्जाधिशाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आठ दिवस राहून जगातील पहिला अंतराळ पर्यटक बनण्याचा मान 2001 मध्ये मिळवला होता. आता अधिकृतरीत्या हे हॉटेल बनत असल्याने किती लोक यशस्वीपणे या हॉटेलचा लाभ घेऊ शकतील हे येणारा काळच सांगेल.