Cybersecurity Risks: भारतातील केवळ 4 टक्के कंपन्या सायबर सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी सज्ज- Cisco
मात्र या समस्येचा सामना करण्यासाठी कंपन्या आपली गुंतवणूक वाढवत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.
Cybersecurity Risks: गेल्या काही वर्षांमध्ये भारतासह जगभरात अनेक कंपन्यांवर सायबर हल्ले (Cyber Attack) झाले आहेत व यामुळे कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. अशात अजूनही भारतातील 4% पेक्षा कमी कंपन्या सायबर सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत.
गुरुवारी जाहीर झालेल्या 2024 सिस्को सायबरसुरक्षा रेडिनेस इंडेक्समध्ये (The 2024 Cisco Cybersecurity Readiness Index) असे आढळून आले आहे की, भारतातील फक्त 4% कंपन्या आजच्या सायबर धोक्यांना सामोरे जाण्यासाठी तयार किंवा सज्ज आहेत, तर 59% कंपन्या 'या तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात' आहेत. जागतिक स्तरावर, केवळ 3% कंपन्या सायबरसुरक्षा जोखमींना तोंड देण्यासाठी तयार आहेत. सिस्कोने सांगितले की कंपन्या या हल्ल्यांविरूद्ध संरक्षण तयार करत आहेत.
हा अभ्यास 8,136 खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक कंपन्यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. यापैकी 1,000 हून अधिक भारतातील आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, 82 टक्के कंपन्यांना पुढील 12-24 महिन्यांत सायबर सुरक्षा हल्ल्यांमुळे त्यांच्या व्यवसायात व्यत्यय येण्याची शंका आहे. अशा हल्ल्यांसाठी 'तयार न होण्याची' किंमत लक्षणीय असू शकते. यासह 74 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना गेल्या 12 महिन्यांत सायबर सुरक्षेशी संबंधित गोष्टींचा सामना करावा लागला आहे. (हेही वाचा: Elon Musk देणार ChatGPT ला टक्कर देणार; पुढील आठवड्यात उपलब्ध होणार Grok 1.5 AI Chatbot, X यूजर्सलाही घेता येणार लाभ)
प्रभावित झालेल्यांपैकी 55 टक्के कंपन्यांनी सांगितले की, सायबर हल्ल्यांमुळे त्यांचे कमीत कमी 300,000 डॉलर्सचे नुकसान झाले आहे. अहवालानुसार कंपन्यांना सायबर सुरक्षेच्या धोक्यांची जाणीव आहे, परंतु अशा समस्या हाताळण्यासाठी प्रतिभावंतांचा अभाव ही देखील मोठी समस्या आहे. जवळजवळ 91 टक्के कंपन्यांनी सांगितले की, प्रतिभेच्या गंभीर कमतरतेमुळे सायबर हल्ल्यांशी दोन हात करण्याबाबत प्रगती रोखली जात आहे. सर्वेक्षणामध्ये 59 टक्के कंपन्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे सायबरसुरक्षा-संबंधित जवळजवळ 10 पदे रिक्त आहेत. मात्र या समस्येचा सामना करण्यासाठी कंपन्या आपली गुंतवणूक वाढवत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. साधारण 71 टक्के कंपन्या पुढील 12-24 महिन्यांत त्यांच्या आयटी पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याची योजना आखत आहेत.