Apple to Create Jobs in India: ॲपल भारतात निर्माण करणार 6 लाखांहून अधिक नोकऱ्या; 70 टक्क्यांहून अधिक असतील महिला कर्मचारी

यातील 70 टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला असतील. प्रत्येक प्रत्यक्ष नोकरीसाठी किमान तीन अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या जातील. म्हणजे एकूण 5 ते 6 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

Apple (Apple / Twitter)

Apple to Create Jobs in India: जेव्हापासून ॲपलने (Apple) भारताकडे मोर्चा वळवला आहे, तेव्हापासून कंपनीच्या फायद्यामध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी भारतात सतत आपला विस्तार करत आहे. यामुळेच भारतातून ॲपल फोनची निर्यात सातत्याने वाढत आहे. आता ॲपल चालू आर्थिक वर्षात भारतात 6 लाख रोजगार निर्माण करणार आहे. यावरून ॲपल भारतात आपला व्यवसाय आणखी जोमात वाढवत असल्याचे दिसत आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ॲपल भारतावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या अलीकडील अहवालानुसार, ॲपलच्या स्थानिक इकोसिस्टममुळे भारतात 600,000 पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ॲपल सुमारे 200,000 थेट नोकऱ्या निर्माण करू शकते. यातील 70 टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला असतील. प्रत्येक प्रत्यक्ष नोकरीसाठी किमान तीन अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या जातील. म्हणजे एकूण 5 ते 6 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

ब्लूमबर्ग न्यूजनुसार, कंपनीने आपल्या तामिळनाडू कारखान्यात हजारो कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्स व्हर्जन त्यांच्या जागतिक रिलीज तारखेच्याआधी व्यवस्थितरीत्या तयार ठेवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. याशिवाय, असे संकेत मिळत आहेत की ॲपल भारतात प्रथमच आगामी आयफोन 16 सिरीज हाय-एंड प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्स एकत्र करण्याची योजना आखत आहे. हे उत्पादन ॲपलच्या भागीदार फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपद्वारे त्यांच्या तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे केले जाईल. (हेही वाचा; Generative AI Adoption मुळे नोकर कपात होणार नाही, Infosys CEO Salil Parekh यांची ग्वाही)

आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारत सध्या ॲपल कंपनीच्या एकूण उत्पादनात सुमारे 14% योगदान देत आहे, जे आर्थिक वर्षे 2023 मध्ये सुमारे 7% होते. फॉक्सकॉन आणि टाटाच्या तामिळनाडूमधील आयफोन आणि घटक कारखान्यांमधून सुमारे 90,000 थेट नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तामिळनाडूने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य स्थान प्राप्त केले आहे आणि राज्य सरकारने नुकतेच फॉक्सकॉन आयफोन कारखान्यात काम करणाऱ्या महिलांसाठी 706.5 कोटी रुपयांच्या मोठ्या औद्योगिक गृहनिर्माण सुविधेचे उद्घाटन केले आहे. एकूणच, गेल्या आर्थिक वर्षात (FY24) कंपनीचे भारतातील कामकाज $23.5 बिलियनवर पोहोचले, ज्यामुळे भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात चीन आणि व्हिएतनामचा एक व्यवहार्य पर्याय म्हणून स्थान मिळाले आहे.