Apple Stores in India: मुंबईमध्ये 18 एप्रिलला तर दिल्लीत 20 एप्रिलला सुरु होणार अॅपल स्टोअर; सीईओ Tim Cook उद्घाटनासाठी येणार- Reports

भारतात अॅपल iPhone ची विक्री आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे. यासोबतच इथली आयफोनची निर्यातही अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.

Tim Cook (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतात पहिल्यांदाच टेक कंपनी अॅपलची (Apple) दोन स्टोअर्स सुरू होणार आहेत. कंपनीचे पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर 18 एप्रिलला मुंबईत आणि दुसरे 20 एप्रिल रोजी दिल्लीत सुरू होईल. मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये सुरू होणार आहे. हा मॉल मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. आणि दुसरे स्टोअर साकेत, दिल्ली येथे उघडेल. अॅपलचे सीईओ टीम कुक (Apple CEO Tim Cook) या स्टोअर्सच्या उद्घाटनासाठी भारतामध्ये येणार आहेत.

टीम कुक यांच्या भारत दौऱ्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. अॅपल साकेतच्या बॅरिकेडचे आज सकाळी अनावरण करण्यात आले. त्याची एक अनोखी रचना आहे जी दिल्लीच्या अनेक गेट्सपासून प्रेरित आहे. मुंबईच्या आउटलेटची रचना शहरातील लोकप्रिय 'काली-पीली' टॅक्सीपासून प्रेरित आहे. हे स्टोअर 20,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरले असून ते 3 मजल्यांचे आहे.

या दोन्ही अॅपल स्टोअरमध्ये अॅपलची सर्व प्रकारची उत्पादने पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळेल. मुंबईतील अॅपल स्टोअर 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उघडेल, तर अॅपल साकेत स्टोअर 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता उघडेल. एका रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की अॅपलने आपल्या स्टोअरसाठी एक करार तयार केला आहे, ज्यानुसार अॅमेझॉनसह 22 ब्रँड अॅपल स्टोअरजवळ त्यांची दुकाने उघडू शकणार नाहीत आणि जाहिरातही करू शकणार नाहीत. या यादीत फेसबुक, गुगल, एलजी, मायक्रोसॉफ्ट आणि सोनी सारखे ब्रँड आहेत. (हेही वाचा: मुंबईमधील Apple च्या रिटेल स्टोअरजवळ Google, LG, Sony सारखे प्रतिस्पर्धी 22 ब्रँड्स आपले दुकान उघडू शकणार नाहीत, पहा यादी)

अॅपलसाठी भारत एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. भारतात अॅपल iPhone ची विक्री आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे. यासोबतच इथली आयफोनची निर्यातही अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. सध्या भारतामध्ये अॅपलची उत्पादने ई-कॉमर्स, Apple Premium Resale Store (APR), रिलायन्स डिजिटल, क्रोमा, मल्टी-ब्रँड रिटेल स्टोअर्स सारख्या मोठ्या रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. मात्र आता ग्राहक अॅपलच्या दुकानातून ही उत्पादने विकत घेणे शक्य आहे.