Apple च्या 'या' उत्पादनांमध्ये बिघाड; विनाशुल्क दुरुस्त करून देण्याची कंपनीची घोषणा
iphone x च्या विकल्या गेलेल्या युनिट्समध्ये टच स्क्रीनची समस्या उद्भवली आहे
आतापर्यंत इतके मोठे स्वागत कोणत्याच फोनचे झाले नाही जितके Apple कंपनीच्या iphone x चे झाले. डोळे पांढरे करायला लावणारी किंमत असूनही जगभरात या फोनने चांगलाच व्यवसाय केला. मात्र इतक्या महागड्या फोनबाबत कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. कारण iphone x च्या विकल्या गेलेल्या युनिट्समध्ये टच स्क्रीनची समस्या उद्भवली आहे. होय, आणि ही गोष्ट स्वतः कंपनीने मान्यदेखील केली आहे.
आयफोन एक्स फोनच्या स्क्रीन टचमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आहे. काही मोबाईलची स्क्रीन अत्यंत संवेदनशील झाली असून, ग्राहकांना फोन हाताळणे कठीण होऊन बसले आहे. काही मोबाईल फोनमध्ये स्क्रीन टच न करताही अनेक अॅप्लीकेशन्स अचानकपणे सुरू होण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच स्क्रीनवर टच करूनही फोन कार्य करत नाही. एक वर्षापूर्वी हा फोन बाजारात विक्रीसाठी आला होता. मात्र मागील काही महिन्यांपासून ग्राहकांकडून या स्क्रीनबाबत येणाऱ्या तक्रारी पाहून कंपनीने आता या फोनची स्क्रीन फ्रीमध्ये बदलून देत असल्याची घोषणा केली आहे. याचसोबत 13-inch MacBook Pro मध्येही काही त्रुटी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यामुळे ग्राहकांचा डेटा नष्ट होऊ शकतो अथवा ड्राइव्ह खराब होऊ शकतो. जून 2017 ते जून 2018 दरम्यान हे लॅपटॉप विकले गेले आहेत. तर या MacBook Pro मध्येही काही समस्या आढळ्यास कंपनी त्या कोणतेही शुल्क न आकारता दुरुस्त करून देणार आहे.
Apple कंपनीची उत्पादने ही इतर उत्पादनांपेक्षा थोडी महाग आहेत, मात्र उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे ग्राहक Appleला पसंती देतात. म्हणूनच ग्लोबल ब्रॅण्ड कन्संलटंसीच्या अहवालानुसार अॅप्पलने गुगलला मागे टाकत 'सर्वोत्तम जागतिक ब्रॅण्ड 2018' हा बहुमान मिळवला आहे. तसेच जाहीर झालेल्या यादीनुसार, अॅप्पलच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत वार्षिक 16 टक्क्यांची वाढ होत ती 21.45 कोटी युएस डॉलरवर पोहचली आहे.