अहमदनगरच्या शुभांगी भंडारे हिची इंग्लंड भरारी, फुटबॉल मध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
लहान वयापासूनच बालभवन प्रकल्पाशी जोडलेली शुभांगी आता सातासमुद्रापार भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे.
अहमदनगरची (Ahmednagar) रहिवाशी शुभांगी राजू भंडारे (Shubhangi Raju Bhandare) हिने गरिबीवर मात करून थेट इंग्लंड (England) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी आपल्या नावी केली आहे. संजयनगर झोपडपट्टी परिसरात राहणारी शुभांगी ही यंदा जागतिक वंचित फुटबॉल सामन्यात भारतीय संघात खेळणार आहे. शुभांगीच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे तिचे वडील वडापाव विकून तर आई एका हॉटेलमध्ये पोळ्या लाटून घराचा खर्च उचलतात पण मुलीच्या या कामगिरीमुळे सध्या भंडारी कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.
शुभांगी ही चौथी इयत्तेत असल्यापासून फुटबॉल खेळते, मागील आठवड्यातच भारतीय महिला फुटबॉल संघाच्या होमलेस वर्ल्डकप 2019 मध्ये खेळण्यासाठी तिचे नाव निवडण्यात आले होते. 27 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान हे फुटबॉलचे सामने इंग्लंड मध्ये कार्डिफ आणि वेल्स याठिकाणी पार पडणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघ 21 जुलै ला मुंबईतून स्कॉटलँड साठी रवाना होईल. या सामन्यांसाठी शुभांगी समवेत संपूर्ण संघाला 1 ते 20 जुलै दरम्यान नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात येईल.
विश्वचषक नेमबाजीत राही सरनोबतची सुवर्ण कामगिरी, टोकियो ऑलिम्पिक 2020 चे तिकीट पक्के
शुभांगी सध्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, लहानपणापासूनच स्नेहालय या संस्थेच्या बालभवन या उपक्रमाच्या निमित्ताने तिला फुटबॉलची आवड लागली होती.बालभवन हा उपक्रम गरीब वस्तीतील मुलांच्या शैक्षणिक ,मानसिक विकासासाठी 18 वर्षांपासून कार्यरत आहे. या उपक्रमाची लाभार्थी शुभांगीला येत्या दोन वर्षात भारतीय फुटबॉल संघात प्रवेश मिळवायचा आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना पुढील आयुष्यात नगरच्या सर्व झोपडपट्ट्यात फुटबॉलची टीम सुरू करण्याची आणि स्पर्धा परीक्षा देऊन IPS (पोलीस अधिकारी) होण्याची शुभांगीची इच्छा शुभांगीने व्यक्त केली.
दरम्यान, इंग्लंड येथे होणाऱ्या सामन्यात व्यक्तिगत खर्च उचलण्यासाठी शुभांगीला आर्थिक मदतीची गरज आहे. तरी, इच्छुकांनी 9011026498 या क्रमांकावर संपर्क साधून सढळ हाताने मदत करावी असे आवाहन बाल भवन प्रकल्पाने केले आहे.