IPL Auction 2025 Live

State Level Sports Competition: राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेबाबत मोठी घोषणा; लातूर, बुलढाणा, सांगली येथे होणार आयोजन, जाणून घ्या सविस्तर

स्थानिक आयोजन समितीस या स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रति खेळ रु.७५.०० लाख उपलब्ध करुन देण्यात येणार असून यशस्वी आयोजनासाठी शासन निधी व्यतिरिक्त अधिक निधीची आवश्यकता भासल्यास आयोजन समितीस निधी उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले.

kho kho (संग्रहित संपादित प्रतिमा)

State Level Sports Competition: राज्यात शासनातर्फे सन २०२३-२४ या वर्षात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा लातूर येथे, छत्रपती शिवाजी महाराज करंडक व्हॉलिबॉल स्पर्धा बुलढाणा येथे, खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लातूर येथे आणि भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली येथे होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. मंत्रालयात विविध विषयांवर आज आयोजित बैठकीत ते बोलत होते.

मंत्री बनसोडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढीकरीता राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेतील प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळावी म्हणून स्पर्धाच्या आयोजनाकरिता शासनाने प्रति खेळ ७५ लाख रुपये एवढी तरतूद केली आहे. प्रतिखेळ ७५ लाख निधीमधून खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच तथा तांत्रिक पदाधिकारी  यांच्यासह खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्थानिक आयोजन समितीस या स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रति खेळ रु.७५.०० लाख उपलब्ध करुन देण्यात येणार असून यशस्वी आयोजनासाठी शासन निधी व्यतिरिक्त अधिक निधीची आवश्यकता भासल्यास आयोजन समितीस निधी उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याचे मंत्री बनसोडे यांनी सांगितले. सर्वसाधारण धोरण ठरविणे, सनियंत्रण करणे, स्पर्धास्थळ निश्चित करणे तसेच स्पर्धेसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करुन देण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आलेले आहे. (हेही वाचा: Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार नाही; आशिया कपसारख्या हायब्रीड मॉडेलमध्ये होण्याची शक्यता)

या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक आयोजन समिती गठित करण्यात आली असून, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्याध्यक्ष, संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक हे कोषाध्यक्ष, संबंधित खेळाच्या राज्य संघटनेचे सचिव हे आयोजन समितीचे सचिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी हे संयुक्त सचिव म्हणून काम पाहणार असल्याचे मंत्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले.