Pakistani Boxer Dies during Fight: बॉक्सर Mohammad Aslam याचं कराचीमध्ये निधन, 'Fight Night Series' इव्हेंट दरम्यान घडली धक्कादायक घटना
बेशुद्ध पडल्यानंतर जखमी बॉक्सरला त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण रुग्णालयात त्याचे निधन झाले. काही अहवालानुसार रिंग-साइडमध्ये कोणतेही वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नव्हते.
कराचीमधील (Karachi) एका खासगी क्लबमध्ये बॉक्सिंग सामन्यादरम्यान बॉक्सर मोहम्मद अस्लम (Mohammad Aslam) खानचे चॅलेंजर वली खानचा (Wali Khan) ठोसा लागल्यानंतर निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बेशुद्ध पडल्यानंतर जखमी बॉक्सरला त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण दुर्दैवाने तो या हल्ल्यापासून वाचू शकला नाही आणि रुग्णालयात त्याचे निधन झाले. मुहम्मद असलम खान बलुचिस्तानच्या (Baluchistan) पाशीन (Pashin) जिल्ह्यातील असून त्याने 80-किलो गटात भाग घेतला होता. वली खान आणि 33 वर्षीय मुहम्मद अस्लम यांच्यात चॅरिटी फाईट खेळली जात होती आणि काही अहवालानुसार रिंग-साइडमध्ये कोणतेही वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नव्हते. एका बॉक्सिंग वेबसाइटने लिहिले: “त्याचे रिंगमध्ये निधन झाले नाही, त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली व त्याची देखभाल करण्यासाठी तेथे कोणी नव्हते.” (Triple H याच्या WWE सुपरस्टार्स संघ आणि टीम इंडिया यांच्यात होऊ शकतो क्रिकेट सामना, पहा काय म्हणाला रेसलिंग रिंगचा स्टार)
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, चेहऱ्यावर जोरदार ठोसा पडल्यानंतर अस्लम बेशुद्ध झाला आणि जमिनीवर पडल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवार, 30 जानेवारी रोजी ही फाईट झाल्याचं म्हटलं जात आहे. बॉक्सरला खासगी रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले मात्र तिथे त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रविवारी दुपारी त्याचे निधन झाले. दरम्यान, पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनने स्वत:ला या फाईटपासून दूर केले आहे आणि ते बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. “या तथाकथित व्यावसायिक बॉक्सिंग कौन्सिलशी आमचा काही संबंध नाही, आमच्या मान्यतेने काही केले जात नाही. आमच्या बॉक्सर्सच्या सुरक्षेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करू शकत नाही,” पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे सरचिटणीस कर्नल नासिर तुंग यांनी जिओ न्यूजला सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “एखाद्याला व्यावसायिक बॉक्सर बनण्यासाठी काही पूर्व-आवश्यकता असतात आणि व्यावसायिक मुष्ठियुद्धीच्या नावाखाली हे बॉक्सर ज्या पद्धतीने स्पर्धा करीत आहेत, ते शंकास्पद आहे.” दरम्यान, बॉक्सिंग रिंगच्या आत मृत्यूचा मुद्दा काही नवीन नाही. आजवर अनके बॉक्सर्सनी या खेळामुळे आपला जीव गमावला आहे.