Maharashtra Kesari Kusti Spardha 2023: अहमदनगर येथे रंगणार 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेचा आखाडा, कसा असेल कार्यक्रम? घ्या जाणून
महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा (Maharashtra Kesari Kusti Spardha 2023) जाहीर झाली असून, यंदा ही स्पर्धा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात रंगणार आहे. सरत्या वर्षातील शेवटच्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील तमाम कुस्तीशौकिनांची प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा (Maharashtra Kesari Kusti Spardha 2023) जाहीर झाली असून, यंदा ही स्पर्धा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात रंगणार आहे. सरत्या वर्षातील शेवटच्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. संयोजन समिती अध्यक्ष आमदार संग्राम जगताप तसेच संयोजन सचिव संतोष भुजबळ यांनी माहिती देताना सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील वाडिया पार्क मैदानावर या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून कुस्ती स्पर्धेच्या आयोजनासाठी मागणी होती. मात्र सर्व बाजूंचा विचार करता आपण अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला असे ते म्हणाले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा देशभरात मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या मल्लास चांदीची गदा भेट दिली जाते. या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. तशीच ती अत्यंत मानाची म्हणूनही ओळखली जाते. ही स्पर्धा जिंकणारा पैलवान हा पुढच्या संपूर्ण आयुष्यात महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेकडे महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमी डोळे लावून असतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी अहमदनगर येथे पार पडणाऱ्या स्पर्धेस मोठे महत्त्व आले आहे. 31 डिसेंबर रोजी स्पर्धेची अंतिम कुस्ती खेळली जाील. अत्यंत चुरशीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते विजेत्यास मनाची गदा दिली जाईल. चांदिची गदा जिंकणारा मल्ल कुस्तीसम्राट म्हणून ओळखला जातो.
महाराष्ट्र केसरीची गदा देण्याची परंपरा 1983 पासून सुरु झाली. कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ ही गदा महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेत्यास दिली जाते. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा 1961 पसून महाराष्ट्रात सुरु झाली तेव्हापासून 1982 पर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेतर्फे दिली जात असे. मात्र, 1983 पासून त्यात बदल करण्यात आला. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी खासदार अशोक (अण्णा) मोहोळ यांनी ही गदा महाराष्ट्र केसरी विजेत्यास देण्याची परंपरा सुरु केली. जी अव्याहतपणे सुरु आहे. उल्लेखनीय असेकी मामासाहेब मोहोळ यांचे वंशज गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळही गदा स्वखर्चाने बनवून राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करतात. या गदेच्या रुपात मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृती कुटुंबीयांनी जीवंत ठेवल्या आहेत.