Coronavirus: लॉकडाउन काळात रोजगार तुटलेल्या धावपटू प्राजक्ता गोडबोलेच्या मदतीला धावले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्वरित मदतीचे दिले आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना प्राजक्ताच्या परिस्थितीची माहिती माहिती मिळाल्यावर त्यांनी नागपूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांना प्राजक्ताच्या कुटुंबाला मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

प्राजक्ता गोडबोले (Photo Credit: Screengrab/Youtube)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) करण्यात आलेल्या राष्ट्रीय लॉकडाउनमुळे (Lockdown) जगण्यासाठी धडपडत असलेल्या भारतीय अंतर धावपटू प्राजक्ता गोडबोलेला (Prajakta Godbole) अखेर राज्य अधिकाऱ्यांनी आवश्यक सहकार्य मिळवून दिले. जगभरात कोरोनाच्या प्रसारामुळे सर्वांचा फटका बसला आहे. क्रीडा क्षेत्राचेही याच्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. खेळाडूंनाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. नागपूरच्या (Nagpur) सिरसापेठ भागात राहणाऱ्या प्राजक्ताची आई लग्नाचं कंत्राट घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे जेवणं बनवायचं काम करते, मात्र सध्याच्या काळात लग्न होत नसल्याने त्यांचे रोजगार तुटले आणि परिणामी गोडबोले परिवाराकडे दोन वेळच्या जेवणासाठीचेही पैसे नव्हते. पण, आता प्राजक्ता आणि तिच्या कुटूंबाच्या परिस्थितीची दाखल घेत सध्या महाराष्ट्र सरकारमधील सत्ताधारी शिवसेनेतर्फे (Shiv Sena) त्यांना मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्राजक्ताच्या परिस्थितीची माहिती माहिती मिळाल्यावर त्यांनी नागपूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला आणि त्वरित प्राजक्ताच्या कुटुंबाला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. (Lockdown: महाराष्ट्राची धावपटू प्राजक्ता गोडबोलेची दुहेरी झुंज, कोरोना संकटात लोकांकडून मिळणाऱ्या मदतीवर गुजराण करतंय कुटुंब)

शिवसेना नागपूर शहरप्रमुख प्रकाश जाधव यांनी पीटीआयला सांगितले की, पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोडबोले विषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना (संपर्क प्रमुख) आवश्यक ती मदत करण्यास सांगितले. “काही दिवसांपूर्वी आम्ही अ‍ॅथलीट गॉडबोलेला रेशन आणि 16,000 रुपयांची छोटी रक्कम दिली होती. आम्ही तिच्याशी संपर्कात राहू आणि सर्वतोपरी मदत करू," असे जाधव यांनी सांगितले.

2019 इटलीमधील वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये प्राजक्ताने 5000 मीटर शर्यतीत भारतीय विद्यापीठांचे प्रतिनिधित्व केले. प्राजक्ताने 18:23.92 अशी वेळ नोंदवली, पण तिला अंतिम फेरी गाठता आली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या भुवनेश्वर हाफ मॅरेथॉनमध्येही प्राजक्ताने दुसरे स्थान मिळवले होते. प्राजक्ताचे वडील विलास गोडबोले हे सिक्युरिटी गार्डचं काम करत होते, मात्र एका अपघातामुळे अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे ते सध्या घरीच असतात. दुसरीकडे, प्राजक्ताची आई घरात एकटी कमावणारी व्यक्ती आहे. त्या स्थानिक केटरिंग व्यवसायात स्वयंपाक करण्याचं काम करते, ज्यातून त्यांना महिन्याकाठी 5 ते 6 हजाराचं उत्पन्न मिळतं. मात्र लॉकडाउनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले ज्यामुळे गोडबोले कुटुंबासमोर मोठं संकटाचा डोंगर उभा होता.