Sunil Chhetri Breaks Pele's Record: सुनील छेत्री कडून ब्राझील दिग्गज पेलेचा आंतरराष्ट्रीय विक्रम मोडीत, आता मेस्सीच्या रेकॉर्डपासून एक गोल मागे

छेत्रीने त्याच्या गोलच्या यादीत आणखी एक गोल जोडला आणि आता त्याचे एकूण 79 आंतरराष्ट्रीय गोल झाले.

सुनील छेत्री (Photo Credit: Twitter)

भारतीय (India) कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) बुधवारी SAFF चॅम्पियनशिप 2021 मध्ये मालदीव विरुद्ध सामन्यात महान फुटबॉलपटू पेलेचा (Pele) विक्रम मोडला. पेलेने ब्राझील (Brazil) साठी 77 गोल केले आणि छेत्रीने मालदीव (Maldives) विरुद्ध लढतीच्या 62 व्या मिनिटाला ब्राझीलच्या दिग्गजांना मागे टाकले. छेत्रीने त्याच्या गोलच्या यादीत आणखी एक गोल जोडला आणि आता त्याचे एकूण 79 आंतरराष्ट्रीय गोल झाले. भारतीय कर्णधार आता आंतरराष्ट्रीय सर्वाधिक गोल करणारा तिसरा सक्रिय फुटबॉलपटू आहे. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि क्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) हे फक्त दोन सक्रिय आंतरराष्ट्रीय फुटबॉलर छेत्रीच्या पुढे आहेत. मेस्सीने एकूण 80 गोल केले आहेत तर, रोनाल्डोच्या नावे 115 गोलची नोंद आहे. याशिवाय भारतीय कर्णधार जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.

भारत आणि मालदीव यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे तर या सामन्यात भारताने बुधवारी मालदीवचा 3-1 असा पराभव करत मालदीवच्या माले येथे 2021 च्या SAF चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के केले. मनवीर सिंगने पहिला गोल केला आणि सुनील छेत्रीने उत्तरार्धात आणखी दोन जोडून भारताला तीन गुण मिळवून दिले. यजमानांसाठी एकमेव गोल मालदीवचा स्ट्रायकर अली अश्फाकने केला, ज्याने पूर्वार्धात पेनल्टी गोल केला. या विजयासह, भारताने 2021 SAFF चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. चॅम्पियनशिपचा अंतिम सामना शनिवारी नेपाळविरुद्ध खेळला जाईल. नेपाळने बांगलादेशविरुद्ध सामना अनिर्णित राखला आणि त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीत स्थान निश्चित झाले. उल्लेखनीय म्हणजे भारताने साखळी सामन्यात नेपाळचा 1-0 असा पराभव केला होता.

मालदीव सध्याचा चॅम्पियन असला तरी भारताने 7 वेळा SAFF चॅम्पियनशिप जिंकली आहे. पण आता पुन्हा एकदा भारताला हे जेतेपद जिंकण्याची संधी आहे. अंतिम फेरीत नेपाळचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.



संबंधित बातम्या