FIH पुरस्कारांत भारतीयांचे वर्चस्व, गुरजीत कौर आणि हरमनप्रीत सिंह सर्वोत्तम खेळाडू; टीम इंडियाच्या झोळीत कोण-कोणते पुरस्कार जाणून घ्या
पुरुष आणि महिला संघांचे पाच खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षकांनी विविध श्रेणींमध्ये अव्वल पारितोषिके मिळवली. टीम इंडियाच्या झोळीत एकूण 8 पुरस्कार पडले आहेत. पुरस्कारांमध्ये भारताने जगभरातील सर्व देशांना क्लीन स्वीप केले आहे.
FIH Hockey Stars Awards 2020/21: आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (International Hockey Federation) वार्षिक पुरस्कारांवर बुधवारी भारतीयांनी (India) वर्चस्व गाजवले. पुरुष आणि महिला संघांचे पाच खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षकांनी विविध श्रेणींमध्ये अव्वल पारितोषिके मिळवली. पण पुरुष ऑलिम्पिक विजेते बेल्जियमने (Belgium) पुरस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पीआर श्रीजेश (PR Sreejesh)आणि सविता पुनिया (Savita Punia) यांनी वर्षाचा सर्वोत्तम गोलकीपर, अनुक्रमे पुरुष आणि महिला, सन्मान पटकावले तर ग्राहम रीड (Graham Reid) आणि Sjoerd Marijne ने अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाचे प्रशिक्षक पुरस्कार पटकावले. टोकियो ऑलिम्पिक खेळात भारतीय पुरुष संघाचे (India Men's Hockey Team) ऐतिहासिक कांस्यपदक आणि महिला संघाच्या अतुलनीय कामगिरीमुळे भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षकांनी FIH हॉकी स्टार्स पुरस्कार 2020-21 वर वर्चस्व गाजवले. एफआयएचने (FIH) म्हटले आहे की या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये जानेवारी 2020 ते टोकियो 2020 च्या समाप्तीपर्यंतचा कालावधीचा विचार केला गेला आहे.
पुरस्कारांबद्दल बोलायचे तर गुरजीत कौर (महिला) आणि हरमनप्रीत सिंग (पुरुष) यांना आपापल्या श्रेणीतील वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार मिळाला. सविता पूनिया (सर्वोत्कृष्ट गोलकीपर, महिला), पीआर श्रीजेश (सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, पुरुष), शर्मिला देवी (सर्वोत्कृष्ट उगवता तारा, महिला) आणि विवेक प्रसाद (सर्वोत्कृष्ट उगवता तारा, पुरुष) तसेच भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक सोर्ड मरिन आणि पुरुष संघ प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनाही पुरस्कार मिळाले. रीड पुरुष संघाचे कायम आहे तर मारिनचा कार्यकाळ टोकियो खेळासोबतच संपुष्टात आला. अशाप्रकारे टीम इंडियाच्या झोळीत एकूण 8 पुरस्कार पडले आहेत. पुरस्कारांमध्ये भारताने जगभरातील सर्व देशांना क्लीन स्वीप केले आहे. नॅशनल असोसिएशन, फॅन्स आणि मीडिया या तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये या पुरस्कारांसाठी मतदान केले जाते.
FIH निवेदनात म्हटले आहे की एकूण 79 राष्ट्रीय संघटनांनी मतदानात भाग घेतला. यामध्ये आफ्रिकेतील 25 पैकी 11, आशियातील 33 पैकी 29, युरोपमधील 42 पैकी 19, ओशनियामधील आठ पैकी तीन आणि पॅन अमेरिकेतील 30 पैकी 17 सदस्यांचा समावेश आहे. विजेते घोषित झाल्यानंतर हॉकी बेल्जियमने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पुरस्कार प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. टोकियो खेळांत भारतीय पुरुष संघाने जर्मनीला 5-4 ने पराभूत करून कांस्यपदक जिंकले आणि हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदकांचा 41 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला.