ATP Finals 2019 Draw: नोवाक जोकोविच, रोजर फेडरर एटीपी फायनल्सच्या एकाच गटात; राफेल नडाल याला डॅनिल मेदवेदेव, अलेक्झांडर झवेरेव्ह यांचे आव्हान

सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांना जर्न बोर्ग गटात स्थान देण्यात आले आहे. शिवाय, जगातील अव्वल क्रमांकाचा स्पेनच्या राफेल नदाल याचा डॅनिल मेदवेदेव, अलेक्झांडर झवेरेव्ह आणि स्टेफानोस त्सिटिपास यांच्यासह आंद्रे आगासी गटात समावेश झाला आहे.

नोवाक जोकोविच, रोजर फेडरर, राफेल नडाल (Photo Credit: Getty)

रविवारीपासून सुरू होणाऱ्या एटीपी फायनल्स (ATP Finals) स्पर्धेच्या ड्रॉ जाहीर करण्यात आला आहे. सर्बियाचा नोवाक जोकोविच (Novak Djokovic) आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर (Roger Federer) यांना जर्न बोर्ग गटात स्थान देण्यात आले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, पाच वेळा चॅम्पियन जोकोविच आणि सहा वेळा चॅम्पियन फेडररशिवाय डोमिनिक थिम (Dominic Thiem) आणि मॅटिओ बेरेटिनी (Matteo Berrettini) यांचादेखील या गटात समावेश करण्यात आला आहे. शिवाय, जगातील अव्वल क्रमांकाचा स्पेनच्या राफेल नडाल (Rafael Nadal) याचा डॅनिल मेदवेदेव(Daniil Medvedev), अलेक्झांडर झवेरेव्ह (Alexander Zverev) आणि स्टेफानोस त्सिटिपास (Stefanos Tsitsipas) यांच्यासह आंद्रे आगासी गटात समावेश झाला आहे. नडाल पहिल्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने दोनदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे, पण आजवर त्याला ही स्पर्धा जिंकता आली नाही.

एटीपी फायनल्स ही मोसमातील शेवटची स्पर्धा असून जागतिक क्रमवारीत अव्वल आठ पुरुष खेळाडू यात सहभागी होतात. राउंड रॉबिन फेरीत खेळाडूंना एकमेकांविरूद्ध तीन सामने खेळावे लागतील आणि दोन्ही गटांतील पहिले दोन खेळाडू सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. दरम्यान, या स्पर्धेच्या आधी, नडाल पुन्हा जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. यापूर्वी नदालने 4 नोव्हेंबर 2018 रोजी प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले होते. नडालने आठव्यांदा अव्वल स्थान गाठले आहे. 1973 नंतर एटीपी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेला तो दुसरा सर्वात मोठ्या वयाचा खेळाडू आहे. वयाच्या 36 व्या वर्षी फेडररने 2018 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता.

वर्ष अखेरीस प्रथम क्रमांकाचा खेळाडू बनून राहण्याचा नडालचा प्रयत्न असेल. आणि जर असे करण्यात तो यशस्वी ठरला तर वर्षाच्या अखेरीस तो अव्वल क्रमांकावर असणारा सर्वात मोठ्या वयाचा खेळाडू ठरेल. नडालने ऑगस्ट 2008 मध्ये पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले होते.