Asian Champions Trophy: उपांत्य फेरीत टीम इंडिया ढेर, जपानने 5-3 ने केले पराभूत; तिसऱ्या स्थानासाठी आता पाकिस्तानशी भिडणार
शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात जपानचा 6-0 असा पराभव केल्यामुळे भारत यंदाही विजयाचा प्रबळ दावेदार होता मात्र आक्रमक जपानने संपूर्ण खेळ बदलला.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Asian Champions Trophy) दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपानने (Japan) गतविजेता आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारताचा (India) 5-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात शानदार खेळ दाखवत जपानने टीम इंडियाला (Team India) एकदाही पुनरागमन करण्याची संधी दिली नाही आणि एकतर्फी विजयाची नोंद केली. भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही, मात्र आता कांस्यपदकासाठी त्यांचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) होणार आहे. हा सामना बुधवारी खेळला जाईल. स्पर्धेच्या शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात त्याच प्रतिस्पर्ध्यांचा 6-0 असा पराभव केल्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वी भारत विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, परंतु जपान संघानी त्यांच्या योजना धुळीस मिळवल्या आणि टीम इंडियावर जबरदस्त विजय मिळवला.
पहिल्या क्वार्टरमध्ये जपानच्या संघाने शानदार खेळ दाखवला आणि सतत भारतीय संघावर आक्रमण करताना दिसला. याचा फायदाही त्यांना झाला. टीम इंडियाने जपानला 6 पेनल्टी कॉर्नर दिले आणि जपानच्या खेळाडूंनीही त्याचा फायदा घेत 2 गोल केले. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने दमदार सुरुवात केली आणि दिलप्रीत सिंहने शानदार गोल करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. यादरम्यान जपानने तिसरा गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलरक्षकाने गोल वाचवला. दुसरा हाफ संपण्यापूर्वी तिसरा गोल करत जपानने भारताला पुन्हा एकदा पिछाडीवर टाकले. तिसऱ्या हाफमध्येही जपानने आक्रमक खेळ दाखवला. संघाने चौथा आणि पाचवा गोल करत भारतीय संघासाठी पुनरागमनाचे दरवाजे बऱ्याच अंशी बंद केले.
अखेरीस सामन्याच्या शेवटच्या हाफमध्ये हरमनप्रीत सिंह आणि हार्दिक सिंह यांनी भारतासाठी 2 गोल केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भारताने हा सामना 5-3 ने गमावला. 2018 मध्ये झालेल्या शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत चॅम्पियन बनला होता, परंतु यंदा तो इतिहासाची पुनरावृत्ती करू शकला नाही. दरम्यान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 22 डिसेंबर रोजी दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत एस कोरियाने अतिशय रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 6-5 असा पराभव केला.