अकोला: सूवर्णपदक विजेता बॉक्सरपटू प्रणव राऊत याची गळफास घेऊन आत्महत्या

त्याला कोणता ताण किंवा मानसिकदृष्ट्या तो दबावात असल्याचे त्याचे वर्तन अजिबातच नव्हते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येबाबत सर्वांनाच धक्का बसल्याचे त्याच्या प्रशिक्षकांनी म्हटले आहे.

Hang | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

अकोला (Akola) जिल्ह्यातील बॉक्सरपटू प्रणव राऊत (ranav Raut) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील शास्त्री स्टेडीयम जवळ असलेल्या क्रीडा प्रबोधिनीत त्याने गळफास घेतला. प्रणव राऊत (Pranav Raut) हा राष्ट्रीय पातळीवरील सूवर्णपदक विजेता (Gold Medalis) खेळाडू आहे. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर क्रीडा वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज (शुक्रवार, 21 फेब्रुवारी) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रणव राऊत हा आत्महत्या करेन असे कोणालाही वाटले नव्हते. आज सकाळपर्यंत त्याचे वर्तन हे सामान्यच होते. आज त्याचा अकोला येथे एक स्थानिक सामनाही होता. त्यामुळे सर्वांसोबत तो क्रीडा प्रबोधिनीत आला. मात्र, त्याच्यासोबतची सर्व मुले परतली. केवळ प्रणवच परतला नव्हता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला बोलविण्यासाठी खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडला नाही. त्यामुळे जबरदस्तीने दरवाजा उघडला असता प्रणवने गळफास घेतल्याचे दिसले. घडल्या प्रकारामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. प्रणवच्या मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली आहे. (हेही वाचा, नागपूर : ऑनलाईन खेळाच्या अधीन झालेल्या 17 वर्षीय मुलीची आत्महत्या !)

दरम्यान, प्रणव राऊत याच्या प्रशिक्षकांशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता, प्रणव हा अत्यंत उत्साही मुलगा होता. त्याला कोणता ताण किंवा मानसिकदृष्ट्या तो दबावात असल्याचे त्याचे वर्तन अजिबातच नव्हते. आजही तो दैनंदिन कार्यक्रमानुसार क्रीडा प्रबोधिनीत आला होता. तो असे काही करेल याची पूसटशी कल्पनाही कोणाला आली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येबाबत सर्वांनाच धक्का बसल्याचे त्याच्या प्रशिक्षकांनी म्हटले आहे.