भारताची बॉक्सर Mary Kom ने रचला इतिहास; 6 सुवर्णपदके प्राप्त करण्याचा जागतिक विक्रम
48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत, मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोटोचा 5-0 ने पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपले नाव कोरले
भारताची बॉक्सर मेरी कोम (Mary Kom) ने आज इतिहास रचला आहे. 35 वर्षीय या महिला खेळाडूने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल 6 सुवर्णपदके प्राप्त करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत, मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोटोचा 5-0 ने पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मेरीचे हे 7 वे पदक आहे. 2002, 2005, 2006, 2008, 2010 मध्ये मेरीने या स्पर्धेत पदक जिंकले होते. 2001 मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. आज केलेल्या या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे.