BCCI च्या नोटीसला हार्दिक पांड्याने दिले असे उत्तर

'कॉफी विथ करण' मधील त्या वादानंतर हार्दिक पांड्याने बीसीसीआयच्या नोटीसला उत्तर दिले.

Hardik Pandya on Koffee with Karan 6 (Photo Credit: Instagram)

करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 6' (Koffee With Karan 6) शो मध्ये महिलांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) बीसीसीआयने (BCCI) शो कॉज नोटीस (Show Cause Notice) बजावली आणि नोटीसला 24 तासाच्या आत उत्तर देण्याची ताकीदही दिली. या नोटीसला उत्तर देताना हार्दिक पांड्याने मला मनापासून पश्चात्ताप होत असल्याचे म्हटले आहे.

"चॅट शो मध्ये केलेल्या विधानाबद्दल मला पश्चात्ताप होत आहे. विधान करण्यापूर्वी त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातील, कोणाप्रती अनादर व्यक्त होईल, याचा मी विचार केला नाही," असे हार्दिक पांड्याने बीसीसीआयच्या नोटीसला उत्तर देताना म्हटले आहे.

तसंच यापुढे अशी चूक करणार नसल्याचे वचनही पांड्याने दिले आहे. हार्दिक म्हणाला की,  "मी शो मधील वातावरणात दंग होत काही कमेंट्स केल्या. पण भविष्यात असे होणार नाही, याची मी खात्री देतो."

कॉफी विथ करण शो मध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल एकत्र गेले होते. तिथे करणच्या प्रश्नांची त्यांनी फारच मोकळेपणानी उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्यावर विशेषत: हार्दिकवर चहुबाजूंनी टीका झाली. नेटकऱ्यांनीही सोशल मीडियात त्यांना चांगलेच ट्रोल केले. त्यानंतर हार्दिकने ट्विटरवरुन जाहिरपणे माफी मागितली. मात्र हा वाद चांगलाच रंगला आणि बीसीसीआयने हार्दिक पांड्या आणि केएल राहुल या दोघांनाही शो कॉज नोटीस पाठवली.