IPL Auction 2025 Live

मोहम्मद आमिर मागोमाग, पाकिस्तानच्या वहाब रियाज याची देखील टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

मोहम्मद आमिरने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या काही दिवसानंतर पाकिस्तानचा आणखी वेगवान गोलंदाज, वहाब रियाज याने देखील खेळाच्या लांबलचक स्वरूपातून (टेस्ट क्रिकेट) निरोप घेतला आहे.

वहाब रियाज (Photo Credit: Getty Images)

मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या काही दिवसानंतर पाकिस्तानचा (Pakistan) आणखी वेगवान गोलंदाज, वहाब रियाज (Wahab Riaz) याने देखील खेळाच्या लांबलचक स्वरूपातून निरोप घेतला आहे. पाकिस्तानच्या दुनिया न्यूजच्या वृत्तनुसार 34 वर्षीय वहाबने पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष एहसान मणी (Ehsan Mani) यांना आपला निर्णय सांगितला. वहाब कॅनडामधील टी-20 लीगमध्ये खेळात असल्याने तो पाकिस्तानात परतल्यानंतर याबाबत औपचारिक घोषणा करेल असे देखील त्याच्याकडून मणी यांना सांगण्यात आले. दहा वर्षाच्या कसोटी कारकीर्दीत वहाबने पाकिस्तानसाठी 27 सामने खेळले. यात त्याने 83 विकेट्स घेतल्या आहेत.

वहाब याची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती ही पाकिस्तान क्रिकेट संघासाठी वाईट बातमी ठरू शकते. वहाबने पाकिस्तानसाठी अंतिम टेस्ट सामना 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध खेळाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध सामन्यासाठी त्यांना संघात स्थान मिळाले नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी दोनदा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली आहे.

दरम्यान, माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर यांनी मोहम्मद आमिर याच्या निवृत्तीनंतर एक भाकीत दर्शवले होते. शोएब म्हणाले होते की, आमिरनंतर आता वहाब रियाझ आणि हसन अली टेस्ट मधून निवृत्ती घोषित करू शकतात.