RCB ची खिल्ली उडवल्याने Virat Kohli च्या चाहत्याने केली मित्राची हत्या; आरोपीला अटक, तपास सुरु

ही धक्कादायक बातमी ऐकून युजर्सही हैराण झाले आहेत. पोलिसांनी धर्मराजला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

रोहित शर्मा व विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांची तुलना नेहमीच त्यांचे चाहते करत असतात. दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांची त्यांच्या आवडत्या खेळाडूंबद्दलची मते भिन्न आहेत. याआधी चाहत्यांमध्ये अशा प्रकारे होणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेमुळे अनेक वादाचे प्रसंग उभे राहिल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र आता आपल्या आवडत्या क्रिकेटपटूवर टीका केल्यामुळे एका क्रिकेट चाहत्याने आपल्या मित्राची हत्या केली आहे.

तामिळनाडूतील अरियालूरमधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपी आणि मयत दोघे चांगले मित्र आहे. गुरुवारी दोघेही दारू पिण्यासाठी बाहेर जात असताना ही घटना घडली. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. दोघांमधील वाद इतका वाढला की दोघांपैकी एकाने दुसऱ्याची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक 24 वर्षीय पी विघ्नेश आणि आरोपी एस धर्मराज दोघेही चांगले मित्र आणि क्रिकेटचे शौकीन आहेत. आयटीआय पूर्ण केलेला विघ्नेश सिंगापूरला जाण्यासाठी जॉब व्हिसाची वाट पाहत होता. विघ्नेश हा रोहित शर्माचा चाहता होता आणि धर्मराज विराट कोहलीचा. दारू पिण्यासाठी बाहेर गेल्यानंतर दोघांमध्ये क्रिकेटबाबत चर्चा सुरु झाली. या चर्चेमध्ये विघ्नेश इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत होता, तर धर्मराज हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा समर्थक होता.

चर्चेदरम्यान, विघ्नेशने आरसीबी आणि विराट कोहलीची कथितपणे खिल्ली उडवली. धर्मराजला अडखळत बोलण्याची सवय होती, याच सवयीची तुलना आरसीबीशी करत विघ्नेशने संघावर आणि विराटवर टीका केली. यामुळे संतापलेल्या धर्मराजने विघ्नेशवर बाटलीने हल्ला केला आणि नंतर क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यात वार केले. त्यानंतर धर्मराज तेथून पळून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी विघ्नेशचा मृतदेह काही मजुरांना दिसला आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. ही धक्कादायक बातमी ऐकून युजर्सही हैराण झाले आहेत. पोलिसांनी धर्मराजला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. (हेही वाचा: Asia Cup 2023: पुढील वर्षी आशिया कप खेळण्यासाठी भारत पाकिस्तानला जाणार का? काय असेल सरकारचा निर्णय)

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या आगामी T20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलियात आहे. भारताने नुकतेच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सराव सामने खेळले. तिथे टीम इंडियाने पहिला सामना जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारत आता 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.