IPL Auction 2025 Live

T20 WC 2021, IND vs PAK: भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी माजी टीम इंडिया दिग्गजचा विराटसेनेला ‘छोटा सल्ला’ - ‘याला युद्ध नव्हे तर...’

कैफने चाहत्यांना विनंती केली आहे की त्यांनी हा सामना युद्धासारखा नव्हे तर सामन्यासारखा खेळावा. 24 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार्‍या ब्लॉकबस्टर सामन्यावर क्रीडा क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) भारत (India) आणि पाकिस्तान  (Pakistan) यांच्यातील टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी एक छोटासा सल्ला दिला आहे. कैफने चाहत्यांना विनंती केली आहे की त्यांनी हा सामना युद्धासारखा नव्हे तर सामन्यासारखा खेळावा. कैफ म्हणाला की राजकारण, द्वेष आणि अहंकार यांपासून दूर राहून क्रिकेट पाहणे ही नेहमीच चांगली कल्पना असते. 24 ऑक्टोबर रोजी दुबईत (Dubai) होणार्‍या ब्लॉकबस्टर सामन्यावर क्रीडा क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागून आहे. विराट कोहलीची टीम इंडिया (Team India) आणि बाबर आजमचा (Babar Azam) पाकिस्तानी संघ टी-20 स्पर्धेच्या आपल्या सलामीच्या सामन्यात आमने-सामने येतील. भारत आणि पाकिस्तान 2012 मध्ये अखेर द्विपक्षीय मालिका खेळले होते परंतु ICC स्पर्धांमध्ये त्यांच्या सामन्यांची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. (IND vs PAK, T20 World Cup 2021: दुबईत भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात ‘या’ पाच खेळाडूंवर असणार सर्वांची नजर)

“या चिंताग्रस्त सकाळी, एक छोटासा सल्ला. राजकारण, द्वेष आणि अहंकार यांपासून दूर राहून क्रिकेट पाहणे ही नेहमीच चांगली कल्पना असते. दिवसाचा आनंद घ्या, आपल्या विजयाचा आनंद घ्या, प्रतिस्पर्ध्याचा पराभव नाही. याला एक खेळ म्हणून समजून घ्या, युद्ध नव्हे. #indvspak,” मोहम्मद कैफने ट्विट केले. विराट कोहली आणि बाबर आझम हे दोन सुपरस्टार फलंदाज विश्वचषकाच्या सामन्यात प्रथमच कर्णधार म्हणून समोरासमोर जाणार आहेत आणि या दोन्ही स्टार खेळाडूंकडून अपेक्षा आधीच शिगेला पोहोचली आहे. दरम्यान वर्ल्ड कपमध्ये  दोन्ही संघातील रेकॉर्डबद्दल बोलायचे तर पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम त्यांच्या प्रत्येक सामन्यापूर्वी नेहमीच चर्चेचा मुद्दा बनला आहे.

क्रिकेट विश्वातील दोन्ही कट्टर संघ आतापर्यंत 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान वनडे विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने 7-0 तर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 5-0 असा भारतीय संघाचा रेकॉर्ड आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात टीम इंडिया आपला विक्रम कायम ठेवते की पाकिस्तान आपल्या पहिल्या विजयाची नोंद करते याची चाहत्यांमध्ये जोरदार उत्सुकता लागून आहे.