The Hundred: शाहरुख खान खरेदी करणार आणखी एक क्रिकेट टीम, सह-मालकीच्या KKR ने ‘द हंड्रेड’ स्पर्धेत गुंतवणूक करण्याची दाखवली तयारी

'द टेलीग्राफ' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान सह-मालकीचा केकेआर आगामी 100 चेंडूंच्या स्पर्धेत गुंतवणूक करण्यास तयार आहे.

शाहरुख खान (Photo Credits-Twitter)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा फक्त फिल्मी विश्वाचा स्टार नाही तो एक यशस्वी व्यापारी देखील आहे. शाहरुखने उत्पादनाबरोबरच क्रिकेटमध्येही आपले पाय यशस्वीपणे पसरवले आहेत. शाहरुखकडे 2 क्रिकेट संघ आहेत आणि आता तिसर्‍या संघातही गुंतवणूकीचा विचार करत असल्याची बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) फ्रँचायझी मालक, कोलकाता नाईट रायडर्स इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) नव्या स्पर्धेत 'द हंड्रेड' (The Hundred) मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. 'द टेलीग्राफ' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान सह-मालकीचा केकेआर आगामी 100 चेंडूंच्या स्पर्धेत गुंतवणूक करण्यास तयार आहे. या स्पर्धेची सुरुवात यंदा जुलै पासून होणार होती, मात्र कोरोना व्हायरस महामारीचा वाढता प्रभाव पाहता स्पर्धा 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. शिवाय ईसीबीने खेळाडूंचे करार देखील रद्द केले आहेत. (The Hundred: ECB ने कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेत सहभागी खेळाडूंचे रद्द केले करार)

जर संपूर्ण सत्र नष्ट झाके तर ECB ला 300 मिलियन पौंडचे नुकसान होऊ शकते. या स्पर्धेत खासगी गुंतवणूक होऊ न देण्याच्या पूर्वीच्या भूमिकेचे ईसीबी पुन्हा मुल्यांकन करीत आहे, असे वृत्तपत्राने म्हटले. 2 एप्रिल रोजी क्रिकेटचा हंगाम सुरू होणार होता, पण जुलैच्या सुरूवातीस आतापर्यंत कोणतेही सामने खेळले जाणार नाहीत. 2015 मध्ये त्रिनिदाद फ्रँचायझी विकत घेत केकेआर मालकांची कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये उपस्थिती आहे. =

'द हंड्रेड' लीगमध्ये 8 संघ सहभागी होतील आणि प्रत्येक संघ घरच्या मैदानावर चार सामने खेळेल. लीग फेरीनंतर प्ले-ऑफचे सामने होतील आणि अखेरीस फायनल सामना खेळला जाईल. या लीगमध्ये प्रत्येक डावात 100 बॉल फेकले जातील आणि प्रत्येक 10 बॉलनंतर फलंदाज आपल्या जागा बदलतील. गोलंदाज सलग 5 किंवा 10 चेंडू टाकू शकतो.