ICC कडून रिषभ पंतला मोठा सन्मान, 2 दिग्गजांना पछाडत पटकावला पहिला 'Player of The Month' मानाचा पुरस्कार
नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध निर्भय फलंदाजीने लाखो मनं जिंकणाऱ्या रिषभ पंतने आंतराष्ट्रीय दिग्गज जो रूट आणि पॉल स्टर्लिंग यांच्यावर मात करत मनाचा पुरस्कार पटकावला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (International Cricket Council) सोमवारी पहिल्या प्लेयर ऑफ दि मंथ पुरस्कारांच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध निर्भय फलंदाजीने लाखो मनं जिंकणाऱ्या रिषभ पंतने (Rishabh Pant) आंतराष्ट्रीय दिग्गज जो रूट (Joe Root) आणि पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) यांच्यावर मात करत मनाचा पुरस्कार पटकावला. सिडनी येथे पंतने 97 धावा फटकावल्या आणि भारताला स्पर्धेत पुनरागमन करून बरोबरी मारण्यास निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर, गब्बा येथे झालेल्या अंतिम सामन्यात पंतने सामन्यात नाबाद 89 धावांची विजयी खेळी केली. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी महिन्याचा सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. आयसीसीने महिन्यातील सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला ज्याचा पंत पहिला पुरुष खेळाडू ठरला.
पंतच्या मागील महिन्यातील कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने 4 डावांत 81.66 च्या सरासरीने 245 धावा केल्या. त्याने 4 झेल टिपले. तसेच एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवला. त्यामुळे ICCच्या मतदान समितीने (ICC Voting Academy for ICC Player of the Month) आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी ऋषभ पंतची निवड केली. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माईलने (Shabnim Ismail) महिला विभागात पुरस्कार पटकावला. इस्माईलला महिन्याभरात टी-20 आणि वनडे सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेत इस्माईलने 7 गडी बाद केले, त्यानंतर टी-20 मालिकेत 5 विकेट घेतल्या.
शबनीम इस्माईल
जानेवारी महिन्यात चाहत्यांसाठी मनोरंजक क्रिकेटची मेजवानी मिळाली ज्याने महिन्याच्या उद्घाटन खेळाडूचा पुरस्काराला अत्यंत स्पर्धात्मक बनवले. पंतला पहिल्या आयसीसी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल भाष्य करताना आयसीसी मतदान अकादमीचे प्रतिनिधी रमीझ राजा म्हणाले, “दोन्ही वेळा पंत दोन वेगवेगळ्या आव्हानांमध्ये दबावात खेळला. त्याने दोन्ही खेळींत अष्टपैलु कामगिरी केली, जो त्याचा स्वभाव आहे.” इस्माईलच्या विजयाबद्दल टिप्पणी देत Mpumelelo Mbangwa म्हणाले, “पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत इस्माईलने शंभर टी-20 विकेट पूर्ण केले. ती हा मैलाचा दगड गाठणारी पहिली दक्षिण आफ्रिकी खेळाडू आहे. तिच्या वेगवान आणि आक्रमकतेमुळे, ती दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाच्या गोलंदाजीचे जोरदार आघाडीने नेतृत्व करत आहे. तिला पाहताना आनंद होतो.”