Pakistan Super League 2022: शाहिद आफ्रिदी बनला PSL चा महागडा गोलंदाज, कोरोनाने सावरून मैदानात आलेल्या माजी पाकिस्तान कर्णधारला धु धु धुतले
इस्लामाबाद युनायटेड विरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने आपल्या चार षटकांच्या कोट्यात 67 धावा लुटल्या ज्या पीएसएलच्या इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाने दिलेल्या सामन्यात सर्वाधिक धावा आहेत.
Pakistan Super League 2022: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) कोरोनामधून सावरून आता क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. देशात सध्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) खेळली जात असून क्वेटा ग्लॅडिएटर्स (Quetta Gladiators) आणि इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) यांच्यातील सामन्यातून आफ्रिदी काल मैदानात उतरला. पण त्याने या वर्षीच्या लीगमधील पहिलाच सामना त्याच्यासाठी काही खास ठरला नाही आणि त्याने स्पर्धेतील एक नकोसा रेकॉर्ड आपल्या नावे केला. इस्लामाबाद युनायटेड विरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने आपल्या चार षटकांच्या कोट्यात 67 धावा लुटल्या ज्या पीएसएलच्या इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाने दिलेल्या सामन्यात सर्वाधिक धावा आहेत. अशाप्रकारे हा नकोसा विक्रम आफ्रिदीच्या नावावर नोंदवला गेला.
इस्लामाबादच्या कॉलिन मुनरो आणि त्यानंतर आझम खान यांनी आफ्रिदीच्या चेंडूंवर षटकारांची बरसात केली. या दोघांनी मिळून आफ्रिदीच्या चार षटकांत एकूण आठ षटकार ठोकले. आझम खानची विकेट आफ्रिदीच्या खात्यात गेली असली, तरी त्यापूर्वी त्याने आफ्रिदीला धु धु धुतलं. आझम खानने 35 चेंडूत 65 धावा केल्या तर मुनरोने 39 चेंडूत नाबाद 72 धावा ठोकल्या. अशाप्रकारे प्रथम फलंदाजी करताना इस्लामाबाद युनायटेडने 20 षटकांत 4 बाद 229 धावांचा डोंगर उभारला. आझम आणि मुनरोशिवाय पॉल स्टर्लिंगने 58 धावांचे योगदान दिले. क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाची धुलाई झाली असली, तरी आफ्रिदीइतका मार कोणीही मारला नाही.
आफ्रिदी व्यतिरिक्त, उर्वरित गोलंदाजांनी 12 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या तर आफ्रिदीने 16.75 च्या इकॉनॉमी रेटने धावा लुटल्या. इस्लामाबाद युनायटेडच्या विशाल धावसंख्येचा प्रत्युत्तरात क्वेटा ग्लॅडिएटर्स संघ 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 19.3 षटकांत 186 धावांत गारद झाला. आफ्रिदी या असमन्यात बॉलनंतर फलंदाजीतही फारसे योगदान देऊ शकला नाही आणि आठ चेंडूत फक्त चार धावा काढून बाद झाला.