पृथ्वी शॉ याचे बंदीनंतर लवकरच होणार पुनरागमन, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई संघात निवड होण्याची शक्यता
पण आता शॉ पुन्हा मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. शॉचा बॅन 16 नोव्हेंबरला संपणार आहे. यादरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळला जाईल आणि यासाठी त्याची निवड होण्याची शक्यता आहे.
भारताचा प्रतिभावान सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अवघ्या 18 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला. कारकीर्दीत फक्त दोन सामने खेळणाऱ्या मुंबईच्या या खेळाडूने भारतीय कसोटी संघात त्याचे स्थान जवळपास पक्क केले होते, पण या युवा खेळाडूच्या कारकीर्दीला लवकरच ब्रेक लागला. मुंबईचा पृथ्वी जुलै 2019 मध्ये डोपिंग टेस्टमध्ये अपयशी ठरला आणि परिणामी बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेत शॉवर खेळाच्या सर्व प्रकारांवर आठ महिन्यांसाठी बंदी घातली. पण आता भारतीय क्रिकेटचा हा चमकणारा तारा पुन्हा मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. 9 नोव्हेंबरला 20 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी टीम इंडियाचा कसोटी सलामीवीर पृथ्वीसाठी एक चांगली बातमी आहे. डोपिंगमुळे 8 महिन्यांच्या बंदीला सामोरे जाणाऱ्या शॉची मुंबईच्या संघात निवड होऊ शकते.
शॉला बीसीसीआयने 'नकळत' खोकला सिरप वापरल्याबद्दल आठ महिन्यांची बंदी घातली. या सिरपमध्ये प्रतिबंधित पदार्थ टेरब्यूटालिन होता. ज्यामुळे पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. शॉचा बॅन 16 नोव्हेंबरला संपणार आहे. यादरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) खेळला जाईल आणि यासाठी त्याची निवड होण्याची शक्यता आहे. मुंबईचा (Mumbai) संघ अजून जाहीर नाही करण्यात आला आहे. सुरुवातीला तीन सामन्यांसाठी संघ जाहीर केला जाईल कारण श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे सध्या टीम इंडियाबरोबर बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहेत. ग्रुप स्टेजमध्ये मुंबईला एकूण 7 सामने खेळायचे आहेत. यापैकी6 मध्ये पृथ्वीला खेळता येणार नाही कारण तोपर्यंत त्याची बंदी संपुष्टात येणार नाही.
शॉच्या मूत्राचा नमुना इंदोरमध्ये 22 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या सामन्यानंतर घेण्यात आला होता. त्यामध्ये बंदी घातलेली ड्रग 'टर्बूटलाईन' सापडली. हे औषध सामान्यत: खोकला आणि थंडीच्या औषधांमध्ये आढळते. पृथ्वीने मानले की त्याने थंडीच्या काळात कफ सिरप घेतला होता, परंतु त्या औषधाची त्याला कल्पना नव्हती. शॉच्या उत्तरावर बीसीसीआय समाधानी होता. या युवा फलंदाजाचा हेतू चुकीचा नसल्याचे कबूल केले होते. पृथ्वीव्यतिरिक्त विदर्भाचे अक्षय दुलारवार आणि राजस्थानच्या दिव्या गजराज यांनाही बंदी घातली होती. पृथ्वीने गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि यात शतकही केले. त्याने दोन कसोटीत एकूण 237 धावा केल्या आहेत. यामध्ये एक अर्धशतकाचा समावेश आहे.