Mohammed Irfan Announced Retirement: दोन दिवसांत 3 निवृत्ती, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

सोशल मीडियावर त्याने ही घोषणा केली.

Photo Credit- X

Mohammed Irfan Announced Retirement: पाकिस्तानचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने (Imad Wasim)शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यंदाच्या टी-20 विश्वचषकातही तो सहभागी झाला होता. या घटनेच्या काही तासांनंतर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनेही (Mohammad Amir)निवृत्ती घेतली. आमिर 2024 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानी संघाचाही भाग होता. या दोघांच्या निवृत्तीनंतर आणखी एका डावखुऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाने निवृत्ती घेतली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने (Mohammad Irfan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे.(Mohammad Amir Retirement: पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने क्रिकेटमधून दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती, सोशल मिडीयावर पोस्टकरून दिली माहिती)

मोहम्मद इरफानही निवृत्त झाला

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. सोशल मीडियावर त्याने ही घोषणा केली. पोस्टमध्ये इरफानने आपल्या सहकाऱ्यांचे आणि प्रशिक्षकाचे आभार मानले. मोहम्मद इरफानने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. इरफान हा क्रिकेट इतिहासातील सर्वात उंचीचा खेळाडू आहे. त्याची उंची 7 फूट एक इंच आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर निवृत्तीची घोषणा करताना 42 वर्षीय मोहम्मद इरफानने लिहिले की, 'मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझ्या सहकाऱ्यांचे आणि प्रशिक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत. प्रेम, उत्साह आणि अविस्मरणीय आठवणींसाठी धन्यवाद. या खेळाने मला सर्व काही दिले आहे, या खेळाला मी पाठिंबा देत राहीन. पाकिस्तान झिंदाबाद.'

इरफानने पाकिस्तानसाठी चार कसोटी सामने खेळले आणि 38.90 च्या सरासरीने 10 बळी घेतले. त्याने आपला पहिला कसोटी सामना फेब्रुवारी 2013 मध्ये केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्याचा शेवटचा कसोटी सामना देखील ऑक्टोबर 2013 मध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, इरफानने 60 सामन्यांमध्ये 30.71 च्या सरासरीने 83 विकेट्स घेतल्या. त्याचा शेवटचा एकदिवसीय सामनाही 1 सप्टेंबर 2016 रोजी इंग्लंडविरुद्ध होता.

पंजाबमध्ये जन्मलेल्या इरफानने 2012 मध्ये भारताविरुद्ध बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला टी-20 सामना खेळला. त्याने 22 टी-20 सामन्यांमध्ये 7.44 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट घेतल्या. त्याचा शेवटचा टी-20 सामना 5 नोव्हेंबर 2019 रोजी कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता.