SL vs NZ: Kane Williamson ने मोडला Virat Kohli चा विक्रम; कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टाकले मागे
यावेळी त्याने विराट कोहलीला एका खास यादीत मागे टाकले आहे.
Kane Williamson Surpasses Virat Kohli’s Record For Highest Runs in Test Cricket: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना गॅले येथे सुरू आहे. या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ पराभवाच्या मार्गावर आहे. मात्र, असे असतानाही स्टार किवी फलंदाज केन विल्यमसनने (Kane Williamson) विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या डावात विल्यमसनने 46 धावा केल्या आणि यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले आहे. तो आता 19 व्या स्थानावर पोहोचला आहे.
केन विल्यमसनने विराटला मागे टाकले
केन विल्यमसनने आतापर्यंत खेळलेल्या 102 कसोटी सामन्यांच्या 180 डावांमध्ये 54.48 च्या सरासरीने 8871 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली 8871 धावांसह 20 व्या स्थानावर आहे. कानपूरमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यात कोहली पुन्हा एकदा विल्यमसनला मागे टाकू शकतो. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याला ‘क्रिकेटचा देव’ म्हटले जाते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपल्या कारकिर्दीत 15929 धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 14 हजार धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. फॅब-4 बद्दल बोलायचे झाले, तर इंग्लंडचा जो रूट 12402 धावांसह खूप पुढे आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या नावावर या फॉरमॅटमध्ये 9685 धावा आहेत. विराट कोहली सध्या फॅब-4 यादीत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
गॅले कसोटी सामन्याची स्थिती काय आहे?
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 602 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 88 धावांवर गारद झाला. दुसऱ्या डावात वृत्त लिहिपर्यंत संघाने 8 विकेट्स गमावत 336 धावा केल्या आहेत. किवी संघ अजूनही यजमानांच्या 178 धावांनी मागे आहेत. श्रीलंकेला गॅले कसोटीत डावात विजय मिळवण्यासाठी फक्त दोन विकेट्सची गरज आहे.