IPL in Thane: ठाणेकरांसाठी खुशखबर! लवकरच शहरात होऊ शकतात आयपीएलचे सामने; CM Eknath shinde यांनी दिले संकेत

या मैदानात आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंनी सराव केला. नवीन खेळपट्टीमुळे मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळणे शक्य झाले आहे.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Instagram)

ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच ठाणे (Thane) शहरातही इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने पाहता येणार आहेत. रविवारी 6 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला ग्रीन सिग्नल दिला आहे. हे सामने ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होऊ शकतात. आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात आयपीएलचे सामने व्हावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मागणी मान्य होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दादोजी कोंडदेव स्टेडियमची खेळपट्टी बीसीसीआयच्या नियमानुसार तयार करण्यात आली आहे, त्यामुळे येत्या काही वर्षांत येथे आयपीएलचे सामने होणे जवळपास निश्चित आहे. याआधी महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात बीसीसीआयच्या नियमानुसार खेळपट्टी नव्हती. त्यामुळे येथे रणजी आणि इतर क्रिकेट सामने होऊ शकले नाहीत. मात्र, आता हे स्टेडियम सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासन गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. आता या ठिकाणी महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे.

नवीन खेळपट्टी बांधल्यानंतर या स्टेडियमवर नुकतेच विजय हजारे रणजी क्रिकेट सामने झाले. या मैदानात आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंनी सराव केला. नवीन खेळपट्टीमुळे मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळणे शक्य झाले आहे. आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामने खेळण्यासाठी मैदानात आधुनिक प्रकाश व्यवस्था असणे आवश्यक असल्याने पालिकेने मैदानात विद्युत यंत्रणा उभारण्याचे काम सुरू केले आहे. (हेही वाचा: हर हर महादेव सिनेमच्या शो दरम्यान ठाण्यातील सिनेमागृहात मोठा राडा, प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची)

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना आयपीएलचे सामने ठाण्यात होणार असल्याचे संकेत दिले. भविष्यात आयपीएलचे सामने ठाण्यात होणार असून ठाण्यात पंचतारांकित हॉटेल उपलब्ध असल्याने खेळाडू ठाण्यातच राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.