IPL 2022: राजस्थान रॉयल्स कर्णधार संजू सॅमसनला 14 कोटींत रिटेन करण्याच्या तयारीत, ‘या’ खेळाडूंच्या नावांवर ही चर्चा सुरु
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या पहिल्या हंगामाची विजेता फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने फलंदाज आणि कर्णधार संजू सॅमसनला आपला पहिला खेळाडू म्हणून कायम ठेवण्याची पुष्टी केली आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 रिटेन्शनची अंतिम मुदत जवळ आल्याने फ्रँचायझींनी मेगा लिलावापूर्वी त्यांना कायम ठेवू इच्छित असलेल्या खेळाडूंची यादी फायनल करणे सुरू केले आहे. प्रत्येक फ्रँचायझीला जास्तीत जास्त चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामाची विजेता फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) फलंदाज आणि कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) आपला पहिला खेळाडू म्हणून कायम ठेवण्याची पुष्टी केली आहे. संघातील उर्वरित जागांसाठी कोणते खेळाडू कायम ठेवणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सर्व फ्रँचायझींना 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसनला कायम ठेवण्याची पुष्टी केली आहे. (IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार रिषभ पंत याच्यासह 4 खेळाडूंना केले रिटेन)
माजी आयपीएल फ्रँचायझीने सॅमसनला तब्बल 14 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले असल्याचे वृत्त ESPNCricinfo ने दिले आहे. तांत्रिकदृष्ट्या फ्रँचायझीला सॅमसनला 16 कोटींमध्ये राखून ठेवायचे असले तरी, तो केवळ 14 कोटींमध्येच तयार झाला. राजस्थान रॉयल्सने कायम ठेवलेला संजू सॅमसन हा पहिला खेळाडू आहे. रॉयल्सने सॅमसनला 2018 मध्ये 8 कोटी रुपयांत ताफ्यात सामील केले होते. तसेच आयपीएलच्या 14व्या हंगामात त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, कर्णधार म्हणून तो फारसा यशस्वी ठरला नाही आणि आपल्या संघाला अंतिम चारमध्येही नेऊ शकला नाही. पण फलंदाज म्हणून मागचा हंगाम खूप यशस्वी ठरला. आयपीएल 2021 मध्ये त्याच्या बॅटने 137 च्या स्ट्राइक रेटने 484 धावा चोपल्या. दरम्यान, सॅमसनला रिटेन केल्यावर आता संघात तीन जागा शिल्लक आहेत ज्यासाठी लियाम लिविंगस्टोन, जोफ्रा आर्चर, यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. आता यापैकी कोणत्या खेळाडूकडे फ्रँचायझी लक्ष देते हे पाहावे लागेल. विशेष म्हणजे बेन स्टोक्सबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असे समजले जात आहे.
दुसरीकडे यशस्वी जयस्वाल हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे जिच्या नावाची चर्चा होत आहे. याशिवाय तो एक अनकॅप्ड खेळाडू असल्याने फ्रँचायझीला त्याला फक्त 4 कोटी रुपयात रिटेन करू शकते.