IPL 2022: आयपीएलमध्ये KulCha जोडीचा ‘याराना’, युजवेंद्र चहल सोबतच्या स्पर्धेवर कुलदीप यादवचे मन जिंकणारे विधान; पाहा काय म्हणाला

कुलदीपने आतापर्यंत 8 सामन्यात 17 विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर त्याचाच मित्र चहल 8 सामन्यांत 18 बळी घेऊन अव्वल स्थानावर विराजमान आहे.

कुलदीप यादव, युजवेंद्र चहल (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर सजणार? याचे उत्तर आपल्याला हंगामाच्या अखेरीस मिळेल, परंतु दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्यात पर्पल कॅपची जोरदार लढत सुरू आहे. कुलदीप यादवने गुरुवारी त्याची जुनी फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध चार विकेट घेतल्या आणि चहल सोबतचे विकेटचे अंतर कमी केले. आता या मोसमात कुलदीप आणि चहलमध्ये फक्त एका विकेटचे अंतर राहिले आहे. सामनावीर ठरलेल्या कुलदीपने आपल्या गोलंदाजीसोबतच आपल्या शब्दांनीही क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. कुलदीपने आतापर्यंत 8 सामन्यात 17 विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर त्याचाच मित्र चहल 8 सामन्यांत 18 बळी घेऊन अव्वल स्थानावर विराजमान आहे. अशा स्थितीत पर्पल कॅपबाबत दोघांमध्ये स्पर्धा जोर धरू लागली आहे. (IPL 2022 Purple Cap Updated List: युजवेंद्र चहलची पर्पल कॅप धोक्यात, कुलदीप यादवने दुसऱ्या स्थानावर घेतली झेप)

चहल सोबतच्या स्पर्धेबाबत कुलदीप म्हणाला, “माझी चहलसोबत कधीही स्पर्धा झाली नाही. तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मी जखमी झाल्यावर त्याने माझे मनोबल वाढवले. या मोसमात त्याने पर्पल कॅप जिंकावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.” कुलदीप आणि चहलने भारतासाठी अनेक मॅच विनिंग कामगिरी केली आहे. दोघांची जोडी ‘KulCha’ म्हणून प्रसिद्ध आहे. खराब फॉर्ममुळे कुलदीप काही काळ टीम इंडियातून बाहेर आहे, पण या मोसमात तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे त्यावरून त्याला लवकरच टीम इंडियाकडून पुन्हा खेळण्याची संधी मिळेल असे दिसत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मोसमात गुरुवारी आणखी एक रोमांचक सामना खेळला गेला. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ आमनेसामने आले, पण दिल्लीने विजय मिळवून आपली गाडी रुळावर आणली. सामन्यात कुलदीपने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या सामन्यात कुलदीपने 3 षटकांत केवळ 14 धावा देत 4 बळी घेतले. त्याने कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, बाबा इंद्रजीत, सुनील नरेन आणि धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेल यांना माघारी धाडलं.