IPL 2021: भारतात वाढत्या COVID-19 ची विदेशी खेळाडूंमध्ये दहशत, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगमधून घेणार एक्झिट

दिवसेंदिवस देशात कोरोना व्हायरस महामारीमुळे स्थिती गंभीर बनली आहे.

ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: Twitter/@IPL)

भारतात कोविड-19 च्या संकटामुळे त्यांना देशाबाहेर लॉक केले जाईल अशा भीतीपोटी अनेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) लवकर सोडण्याच्या विचारात आहेत. दिवसेंदिवस देशात कोरोना व्हायरस महामारीमुळे स्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन पत्रकार Daniel Cherny यांनी एका लेखाद्वारे खुलासा केला आहे की, अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू दिवसेंदिवस भारतातील कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) उद्रेकामुळे घाबरून गेले आहेत आणि प्रतिष्ठित लीगमधून लवकर बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. भारतात कोविड-19 प्रकरणांमध्ये (Indian COVID-19 Cases) झपाट्याने वाढ होत असलेल्या आयपीएल 2021 च्या आयोजनावर बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. मागील 24 तासात विक्रमी 3,46,786 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालये उपलब्ध नाही आहे, ऑक्सिजनचा पुरवठा देखी कमी आहे, आणि डॉक्टरांना भेटण्याच्या प्रतिक्षेत लोक लाइनमध्ये मरण पावले आहेत. (IPL 2021: अनुचित की विचलित करण्यासाठी? भारताच्या वाढत्या ‘भयावह’ कोविड-19 घटनांमध्ये आयपीएल खेळवण्यावर Adam Gilchrist यांचा BCCI ला सवाल)

दरम्यान, आयपीएलमध्ये यंदा देखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी नाही आहे आणि स्टिव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि पॅट कमिन्स यांच्यासह जगातील अनेक आघाडीचे ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय स्टार क्रिकेटपटू इथे खेळत आहेत. ऑस्ट्रेलियातील अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, भारताच्या कोविडच्या वाढत्या संकटामुळे त्यांना देशाबाहेर लॉक केले जाईल या भीतीपोटी ऑस्ट्रेलियाचे अनेक क्रिकेटपटू लवकर स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. स्कॉट मॉरिसनच्या नेतृत्वातील सरकारने भारतातून येणारी उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी सुरक्षित रस्ता मिळणार की नाही याबाबत चिंता करीत असल्याचं कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) मार्गदर्शक डेविड हसी यांनी द एज यांना सांगितले. हसी म्हणाले की ऑस्ट्रेलियन सरकारचा हा निर्णय बऱ्याच खेळाडूंना स्पर्धा लवकर सोडण्यासाठी प्रवृत्त करू शकते.

उल्लेखनीय म्हणजे, जागतिक आरोग्य संकटामुळे आयपीएल 2021 काही खास निकषांतर्गत खेळवण्यात येत आहे. आयपीएल 2021 सुरळीत पार पडण्यासाठी सर्व संघ कठोर जैव-सुरक्षित बबलमध्ये राहत आहेत. देवदत्त पडिकक्कल, अक्षर पटेल आणि लियाम लिविंगस्टोन अशा काही खेळाडूंना स्पर्धेपूर्वी विषाणूचा संसर्ग झाला असला तरी आता त्यांचा कोरोना व्हायरस अहवाल नकारात्मक आला असून हंगाम सुरू झाल्यापासून कोणत्याही खेळाडूला विषाणूचा संसर्ग झालेला नाही. तथापि, स्पर्धा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि या दराने प्रकरणांची संख्या वाढत राहिल्यास, बीसीसीआयला कठोर निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंत या मोसमातील पहिले 20 खेळ मुंबई व चेन्नई येथे झाले आहेत. तथापि, हंगामात प्रगती होत असल्याने आगामी सामने दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि बेंगलोर येथे आयोजित केले आहे.